तलावफैलात टँकरची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:10 PM2018-04-07T22:10:08+5:302018-04-07T22:10:08+5:30
शहरातील जुन्या वसाहतीमध्ये अरूंद रस्त्यांमुळे टँकर आतपर्यंत शिरतच नाही. अशा ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी रात्री मैलोन्मैल पायपीट करावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील जुन्या वसाहतीमध्ये अरूंद रस्त्यांमुळे टँकर आतपर्यंत शिरतच नाही. अशा ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी रात्री मैलोन्मैल पायपीट करावी लागते. यावर मात करण्यासाठी तलाव फैलातील नागरिकांनी लोकवर्गणी करून विहिरीतला गाळ उपसला. पण हे पाणी अपुरे पडत आहे. विहिरीचे खोलीकरण केल्यास मुबलक पाणी लागेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाने विलंब लावला. यामुळे तलाव फैलातील काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील महिला दिवसभर काम करून पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार आहे.
तलाव फैलमधील पॉवर हाऊसमध्ये २३ दिवसानंतर नळ आले. या नळाचे पाणी परिसरातील अर्ध्या भागाला मिळालेच नाही. प्राधिकरणाची पाईपलाईन चोकअप झाल्याने हे पाणी अनेकांच्या घरापर्यंत पोहोचले नाही. या भागातील नागरिकांनी नगरसेवक आणि जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केली. पण चोकअप निघाला नाही. यामुळे या भागात अजूनही पाणी आले नाही, असे मत महेश ठाकरे यांनी व्यक्त केले.
या भागात हापशीला सबमर्शिबल पंप लावून शौचालयात नेले आहे. या टंचाई काळामध्ये नागरिकासाठी हापशी मोकळी केली तर, पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना व्हाव्या आणि या हापशीवरून नळाचे पॉर्इंट या भागात दिले, तर पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटेल, असे मत लता राऊत यांनी व्यक्त केले.
तलाव फैलातील काही भाग आणि गवळीपुरामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. या भागातील अरूंद रस्त्यामध्ये टँकर शिरत नाही. यामुळे आम्हाला टँकरचे पाणी मिळाले नाही. अरूंद रस्त्यांच्या वस्तीमध्ये विहीर आहे. या विहिरीचे पाणी खोल गेले आहे. यामुळे नागरिकांनी लोकवर्गणी करून विहिरीतला गाळ काढला. नगरपरिषदेने या विहिरीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप नागरिकांनी केला. त्याला खोल केल्यास पाणीटंचाई संपेल. ब्लिचिंग टाकल्यास विहिरीतील पाणी स्वच्छ होईल, असे शोभा मस्के, जया विंचूरकर, प्रज्ञा दांडेकर, रेखा जीवतोडे, पुष्पा मस्के म्हणाल्या.
या भागातील नागरिकांना पंचशील चौक, छोटी गुजरी, लोखंडी पुल, जीनमधून पाणी आणावे लागते. दिवसभर काम करून महिला गुंडाने पाणी भरतात. तर काही जण रात्रीला रिक्षाच्या माध्यमातून पाणी आणतात. अनेकांना पाण्यासाठी कामावर जाता येत नाही. यातून अनेकांची रोजमजुरी बुडाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पुष्पा माने, मनिषा बानोरे, यांनी केला.
पाणीटंचाई नसतानाही या भागातील नागरिकांना पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागते. नळाच्या प्रतीक्षेत रात्र जागून काढावी लागते. मोटर लावल्याशिवाय वर पाणी चढत नाही. वारंवार तक्रारी करूनही हा प्रश्न निकाली काढला नाही. आता त्यांना भीषण पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.
लोहाऱ्यातून आणावे लागते पाणी
पाण्याची तजवीज करताना, नागरिकांनी लोहाºयाकडे धाव घेतली आहे. या ठिकाणावरून खासगी आॅटोरिक्षा आणि अॅपेमध्ये पाणी भरून आणावे लागत आहे. अनेकांकडे पाण्याची साठवणूक करण्यासाठी टाक्या नाही. तर अनेकांना पाण्याच्या टाक्या भाड्याने घ्याव्या लागल्या आहेत.
चारच हापशा जिवंत
या भागात पाण्याच्या ९ हापशांपैकी चार हापशांनाच पाणी आहे. यामुळे नागरिकांना हातपंपावरून पाणी भरण्यासाठी जिवंत स्त्रोतांकडे धाव घ्यावी लागते. यामुळे पाण्याच्या स्त्रोतावर प्रचंड गर्दी उसळत आहे.