फ्लोराईडयुक्त पाणी उठले मजुरांच्या जीवावर

By admin | Published: May 29, 2016 02:34 AM2016-05-29T02:34:43+5:302016-05-29T02:34:43+5:30

दूषित आणि फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे तालुक्यात शेकडो नागरिकांना किडणीचा आजार जडला आहे.

Fluoride water rises on the life of laborers | फ्लोराईडयुक्त पाणी उठले मजुरांच्या जीवावर

फ्लोराईडयुक्त पाणी उठले मजुरांच्या जीवावर

Next

अनेकांना किडणीचे आजार : तीव्र टंचाईच्या काळात महागाव तालुक्यात दूषित पाण्याची समस्या
महागाव : दूषित आणि फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे तालुक्यात शेकडो नागरिकांना किडणीचा आजार जडला आहे. अशा रुग्णांमध्ये रोजमजुरी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पाणीटंचाईच्या काळात दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याने मजुरांचा जीव धोक्यात आहे.
विशेष म्हणजे, किडणीचा आजार जडलेल्या लोकांमध्ये ३० ते ६० वर्षाच्या व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण दारिद्र्यरेषेखालील यादीत मोडणारे आहे. किडणीच्या आजारावरील महागडा उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे उपचाराविना मरणासन्न अवस्थेत अनेक जण जगत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव-९, पोहंडूळ - ८, काळी दौलत-२१, फुलसावंगी - १६, सवना -२९ अशा प्रकारे किडणीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. प्रत्यक्षात रुग्ण संख्या यापेक्षाही अधिक आहे.
दूषित आणि फ्लोराईडयुक्त पाणी पिल्यामुळे या आजाराची सुरुवात होत असल्याचे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी व्यक्त केले आहे. तालुक्यातील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून बहुतांश नमुने पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. अशा हातपंपावर प्रतिबंध लावण्यात आला असून पाणी टंचाई असल्यामुळे नागरिक त्याचा सर्रास वापर करीत आहे.
फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे ज्या गावात सर्वाधिक रुग्ण आढळले तेथे आॅरोचे पाणी पुरविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. पुसद विधानसभेतील परंतु महागाव तालुक्यात येणारे वडद, ब्रह्मी, साई, बोरी या गावात आमदार मनोहरराव नाईक यांच्या आमदार फंडातून आॅरोच्या पाण्याचे एटीएम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील रुग्ण संख्येत घट झाली आहे. १०० टक्के प्रभावित असलेल्या गावात लोकसंख्येनुसार दोन एटीएम बसविले तरी रुग्ण संख्या कमी होऊ शकते. मात्र पाण्याची स्थिती अत्यंत वाईट असतानाही कोणत्याही गावातून एटीएमची मागणी पुढे आली नाही किंवा प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Fluoride water rises on the life of laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.