ओमप्रकाशच्या लोकेशनसाठी कॉल डिटेल्सवर लक्ष केंद्रित
By admin | Published: September 20, 2015 12:13 AM2015-09-20T00:13:45+5:302015-09-20T00:13:45+5:30
येथील सोनालीच्या खुनप्रकरणात असलेल्या संशयित आरोपीच्या शोधात पोलिसांचे दोन पथक नागपूरमध्ये दाखल झाले आहे.
पोलीस पथक नागपुरात : सोनाली खूनप्रकरण,
यवतमाळ : येथील सोनालीच्या खुनप्रकरणात असलेल्या संशयित आरोपीच्या शोधात पोलिसांचे दोन पथक नागपूरमध्ये दाखल झाले आहे. तर आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सवरून लोकेशन निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
शुक्रवारी सकाळी भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून चाकूने भोसकून विद्यार्थिनीचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण शहरातच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणाही तपासात लागली. संशयिताचे नाव आणि मूळ गावचा पत्ता मिळवून त्याचे घर गाठले. नातेवाईकांकडून संशयित आरोपी ओमप्रकाश तेजराज गुजवार याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. खुनाच्या घटनेनंतर आरोपी नेमका पळाला कुठे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून त्याच्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन व कॉल डिटेल्स घेतले जात आहे. लवकरच आरोपी हाती लागेल अशी खात्री तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सोनालीच्या मृत्यूनंतर शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी संतप्त ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड व आमदार मदन येरावार यांनी शवविच्छेदन गृहाजवळच भेट घेतली. या प्रकरणात सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले.
शिवाय रुग्णालयात अनेक समस्या असून व्हेन्टीलेटर नसल्यामुळे जीव गमवावा लागल्याची माहिती मंत्र्यांना दिली. लोहारा परिसरात मंजूर असलेले पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू केले जावे, अशीही मागणी यावेळी सरपंच बबलू देशमुख, संतोष डोईजड, फिरोज पठाण आदींसह ग्रामस्थांनी केली. त्यानंतर सोनालीच्या पार्थिवावर लोहारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)