चारा, पाण्यासाठी वन्यजीवांची गावांकडे धाव
By admin | Published: March 11, 2015 01:54 AM2015-03-11T01:54:13+5:302015-03-11T01:54:13+5:30
जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. ही जनावरे विशेषत: माकड अनेकांच्या घरात शिरुन साहित्याची नासधूस करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दारव्हा : जंगलात चारा, पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहेत. ही जनावरे विशेषत: माकड अनेकांच्या घरात शिरुन साहित्याची नासधूस करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रोही, रानडुक्कर, हरीण, लांडगा, माकड आदी वन्यजीवांनी वनालगतच्या शेतांमध्ये उच्छाद मांडला आहे. उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. अनेकांची रबी पिके धोक्यात आली आहे. माकडं शहरात शिरून घरावर वाळविण्यासाठी टाकलेल्या साहित्याची नासधूस करतात. उन्हाळा सुरू झाल्याने महिला विविध प्रकारचे पदार्थ तयार करून घराच्या गच्चीवर वाळविण्यासाठी घालतात. हे पदार्थ माकड फस्त करून टाकतात. हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येण्यास मागेपुढे पाहत नाही. काही दिवसांपूर्वी माकडाने काही जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
बीबट यासारखे हिंस्त्र प्राणीही गावालगत आढळतात. गेली काही दिवसात तालुक्यात तीन बीबट मरण पावले. या घटना गावालगतच घडल्या. त्यामुळे चारा, पाण्याच्या शोधात वन्यजीव आता गावाकडे भटकत असल्याचे स्पष्ट होते.
जंगलातच वन्यजिवांसाठी चारा, पाण्याची सोय व्हावी यासाठी विविध योजना राबविल्या जातात. वनविभागाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च यावर केला जातो. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)