अवैध मुरूम उत्खननप्रकरणी महसूल विभागाची पाठराखण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:42 AM2021-09-19T04:42:58+5:302021-09-19T04:42:58+5:30
महागाव : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मुरूम, रेती उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ...
महागाव : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मुरूम, रेती उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी डोंगरगाव येथील सैय्यद मुदस्सीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
डोंगरगाव येथील शेत सर्वे नंबर ३५/२ मधून मुरमाचे उत्खनन करण्यासाठी राजेश देशमुख यांनी तहसील कार्यालयातून २० ब्रासची रॉयल्टी काढली. जेसीबी मशिनच्या साह्याने त्यांनी हजारो ब्रास मुरमाचे उत्खनन केल्याची तक्रार सय्यद मुदस्सीर यांनी ४ ऑगस्ट रोजी केली होती. परंतु या संदर्भात महसूल विभागाने कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
या संदर्भात महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी व तलाठ्याकडून अहवाल मागविवण्यात आला होता. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी डोंगरगाव येथील स्थळ पाहणी करून देशमुख यांच्या बांधकामावर जोत्यामध्ये अंदाजे २०० ब्रास, साठा ३०० ब्रास व गावात इतर ठिकाणी टाकलेला आढळला. मात्र, त्यांनी मोघम अहवाल सादर केल्याचे सैयद मुदस्सीर यांचे म्हणणे आहे. संबंधित उत्खननाचे मूल्यांकन करण्याचे मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी कळविले आहे. तहसीलदार विश्वंभर राणे यांनी यंत्रणेशी संवाद साधून न्याय द्यावा, अशी मागणी मुदस्सीर यांनी केली आहे.
बॉक्स
४४ ब्रासचे उत्खनन झाल्याचा अहवाल
महसूल विभागाने तक्रारदारांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता बांधकाम विभागामार्फत उत्खनन केलेल्या जागेचे मूल्यांकन करून ४४ ब्रास उत्खनन झाल्याचा अहवाल दिला. अहवाल प्राप्त होताच यापूर्वी या सर्वे नंबरमधून तातेराव नामक ग्रामस्थाने २० ब्रास मुरमाची रॉयल्टी काढली. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन करण्यात आले.
कोट
मी नुकताच प्रभार हाती घेतला. या संदर्भात अधिक चौकशी करून अनियमितता आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
विश्वंभर राणे, प्रभारी तहसीलदार, महागाव