आमदारांच्या सूचनेनंतर पोलिसांच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:23 PM2018-05-18T22:23:30+5:302018-05-18T22:23:30+5:30
तालुक्यातील पिंपळगाव (रुईकर) येथे महिलांच्या पुढाकारातून पोलिसांनी धाड घालून दारू जप्त केली. पिंपळगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु विकली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (रुईकर) येथे महिलांच्या पुढाकारातून पोलिसांनी धाड घालून दारू जप्त केली.
पिंपळगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु विकली जाते. आर्थिक हितसंबधातून पोलीस कारवाई करीत नाही. त्यामुळे येथील महिलांनी थेट आमदार डॉ.अशोक उईके यांच्याकडे तक्रार केली. आमदारांनी पोलिसांना अल्टीमेटम दिला. त्यानंतर महिलांच्या पुढाकारातून बुधवारी पोलिसांनी अनेकांची दारु पकडली.
दारुबंदी व व्यसनमुक्ती अभियानाचे तालुका संघटक विशाल वाघ यांनी पिंपळगाव येथे महिलांमध्ये जनजागृती केली. महिलांनी पुढाकार घेतला, तर गावातून दारु हद्दपार होऊ शकते, असा विश्वास त्यांनी महिलांमध्ये निर्माण केला. यानंतर महिलांनी पोलिसांना सोबत घेऊन दारुविक्रेत्यांच्या घराकडे मोर्चा वळविला. यात अनेकांच्या घरी दारु आढळली. काहींनी तर चक्क शौचालयात दारु ठेवली होती. पोलीस उपनिरीक्षक राजकिरण मडावी यांच्या नेतृत्वात दारु पकडण्याची मोहीम राबविण्यात आली.
वाचनालयातून दारुची विक्री
वाचनालय हे अतिशय पवित्र ठिकाण मानले जाते. मंदिरापेक्षाही वाचनालयाला उच्च स्थान दिले जाते. परंतु पिंपळगाव येथे तर चक्क वाचनालयात दारु आढळली. याची वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज आहे.