तब्बल ३७ लाख शेतकऱ्यांचे रेशन थांबले; १४ जिल्ह्यांत प्रश्न गंभीर
By रूपेश उत्तरवार | Published: December 12, 2022 10:57 AM2022-12-12T10:57:58+5:302022-12-12T11:02:24+5:30
भारतीय खाद्य निगमचा रेड सिग्नल
यवतमाळ : भारतीय खाद्य निगमने १४ जिल्ह्यातील ३७ लाख शेतकऱ्यांचे धान्य रोखले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गहू आणि तांदूळ न मिळाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
सन २०१३ मध्ये देशात अन्न सुरक्षा कायदा आला. २०१४ मध्ये राज्याने या कायद्याला मंजुरी दिली. २०१५ पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य वितरित करण्यात येत आहे. प्रत्येकांना किमान पाेटभर अन्न मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. यातूनच एपीएल शेतकरी गटातील शेतकऱ्यांना प्रती व्यक्ती पाच किलो धान्य वितरित केले जात होते.
दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ या योजनेतून दिले जात होते. यामुळे कोरडवाहू शेतकरीदेखील निश्चिंत होते. मात्र, एपीएल शेतकरी गटाचे धान्य टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आले आहे. यात जुलै महिन्यापासून गहू आणि सप्टेंबर महिन्यापासून तांदूळ राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे मागील सहा महिन्यांपासून या योजनेतील धान्य मिळाले नाही. एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असताना दुसरीकडे धान्य थांबल्याने ते चिंतेत सापडले आहे.
एफसीआयकडून कोटा न मिळाल्याने शेतकरी गटातील धान्याचे वितरण झाले आहे. वरिष्ठांकडे ही बाब मांडण्यात आली आहे. कोटा आला तर धान्याचे वितरण नक्की होईल.
- सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ
जिल्हा - कार्ड संख्या - लाभार्थी
- अकोला - ४०,७७६ -१,६०,५७६
- अमरावती - १,०९,३७२ - ४,५६,४२८
- औरंगाबाद - ७४,०४९ - ३,४२,३१८
- बीड - १,३५,३३६ - ५,५०,१५४
- बुलढाणा - ८४,१७१ - ३,५१,६०८
- हिंगोली - ३७,७६३ - १,६८,४८१
- जालना - २९,४०३ - १,३२,५९७
- लातूर - ५७,२३२ - २,७४,८५६
- नांदेड - ८८,६८० - ३,६५,५९३
- उस्मानाबाद - ५२,८४७ - २,४६,४९८
- परभणी - ५२,३९३ - २,३२,७९३
- वर्धा - १०,८३६ - ४४,३६९
- वाशिम - ९,८०६ - ७७,९३२
- यवतमाळ - ८७,१६९ - ३,४९,५६०
एकूण - ८,७९,८५७ - ३७,५२,८३४