ट्रकच्या धडकेत युवक जागीच ठार
By admin | Published: August 9, 2015 12:07 AM2015-08-09T00:07:24+5:302015-08-09T00:07:24+5:30
येथून वरोराकडे जाणाऱ्या रेल्वे क्रासींगसमोर समोर शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीला जबर धडक दिली.
घटनास्थळी तणाव : उत्तरीय तपासणी नाही, रूग्णालयात गर्दी
वणी : येथून वरोराकडे जाणाऱ्या रेल्वे क्रासींगसमोर समोर शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसून असलेला २७ वर्षीय युवक अंकुश अशोक विखनकर हा जागीच ठार झाला, तर दुचाकी चालक गोपाल विठठ्ल होले गंभी जखमी झाला. या अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
येथील एकतानगरातील मृतक अंकुश विखनकर आणि त्याचा मित्र जखमी अशोक होले हे दोन युवक शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एम.एच.२९-ए.पी.८२७९ या दुचाकीने वरोरा मार्गावरील गुंजेच्या मारोतीच्या दर्शनाला जात होते. त्याचवेळी मागून कोलारपिंपरी कोळसा खाणीतून कोळसा भरून आलेला १२ चाकांचा एम.एच.४0-वाय.७८६६ हा हायवा ट्रक भरधाव वेगाने येत होता. या ट्रकने रेल्वे क्रॉसिंगसमोर दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक अशोक होले दूर फेकला गेला, तर अंकुश विखनकर हा ट्रकच्या समोरील चाकाखाली दबून तो जागीच ठार झाला. ट्रक चालकाने तेथून लगेच पळ काढला.
अपघाताची माहिती कळताच एकतानगरमधील अनेक नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रकच्या काचा फोडल्या. वाहतूक पोलिसही त्वरित तेथे पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिक व जखमी अशोकने अंकुशला त्वरित येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर घटनास्थळ आणि रूग्णालयात गर्दी गोळा झाली होती. तेथे तणाव निर्माण झाला होता.
मृतक अंकुशच्या कुटंबाला १0 लाखांची नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करू न देण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे रूग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. ट्रक चालक पोलीस ठाण्यात पोहोचून त्याने अटक करवून घेतली. त्याच्याविरूद्ध भादंवि २७९, ३३७, ३0४ अ, १३४, आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अंकुशच्या मृतदेहाची वृत्तलिहिस्तोवर उत्तरीय तपासणी झाली नव्हती. मृतकाचे वडील रीक्षा चालक, तर आई घरकाम करते. त्याला एक लहान भाऊ आहे. (प्रतिनिधी)