बळजबरीने विष पाजून तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव; बाप-लेक गजाआड

By विशाल सोनटक्के | Published: August 25, 2022 06:17 PM2022-08-25T18:17:49+5:302022-08-25T18:30:08+5:30

भांडण आणि संजयच्या व्यसनामुळे त्याचा काटा काढल्याचे दोघांनी कबूल केले.

Forcefully poisoned a youth and faked suicide, father and son arrested | बळजबरीने विष पाजून तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव; बाप-लेक गजाआड

बळजबरीने विष पाजून तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव; बाप-लेक गजाआड

Next

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील आमणी येथे वडील आणि मोठ्या मुलाने लहान मुलाचा खून करून आत्महत्येचा देखावा निर्माण केला. या प्रकरणात पोलिसांनी बाप व मुलाला गजाआड केले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.

संजय सेवादास चव्हाण (३२) असे मृताचे नाव आहे. सेवादास लच्छीराम चव्हाण (६०) आणि रामेश्वर सेवादास चव्हाण (३४) असे आरोपी वडील व मुलाचे नाव आहे. मृत संजय चव्हाण घरी नेहमी वाद करीत होता. २३ ऑगस्टला तो घरुन निघून गेला होता. त्यानंतर त्याच दिवशी वडील सेवादास यांनी मोठा मुलगा रामेश्वरला तुझा लहान भाऊ घरी आला नाही म्हणून गजानन चव्हाण सोबत संजयला शोधण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर संजय शेतातील कॅनॉलमध्ये पडून असल्याचेही सांगितले. त्यामुळे रामेश्वर गावातील ऑटोरिक्षा घेवून शेतात गेला. वडील, मुलगा रामेश्वर गजानन चव्हाणने संजयला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, संजय नेहमी अतिवृष्टीमुळे पीक बुडाले असून अंगावरील कर्ज कसे फेडू असे म्हणत आत्महत्या करण्याचा विचार करीत होता, अशी फिर्याद रामेश्वर चव्हाण याने पोलिसात दिली. मात्र पोलिसांना संशय आला. तसेच मृत संजयच्या तोंडाचा विष प्राशन केल्यासारखा वास येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तथापि पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. नंतर दोन पंचासमक्ष पंचनामा केला. घटनास्थळी जावून चौकशी केली. त्यानंतर संजयची पत्नी कविताने तक्रार दिली.

पोलिसांनी आमणीचे पोलीस पाटील यांचा लेखी जवाब घेतला. घटनास्थळच्या बाजूचे शेत शेजारी निर्मलाबाई भोयर यांचाही जवाब घेतला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भवरे यांनी संजयचा मृत्यू विषारी औषध प्राशन केल्याने न होता त्याचा गळा दाबून खून केल्याचा अंदाज वर्तविला. उत्तरीय तपासणीपूर्वीच त्यांनी ही शंका व्यक्त केल्याने पोलिसांनी तातडीने संजयचे वडील सेवादास आणि मोठा भाऊ रामेश्वर या दोघांना विश्वासात घेवून चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक वास्तव उघड झाले.

या दोघांनी आपल्या घरी साडेसात एकर शेती असून त्यापैकी दोन एकर शेती संजयच्या नावे असल्याचे सांगितले. तसेच संजयला मद्यप्राशन करण्याचे व्यसन होते. त्याच्या व्यसनामुळे नेहमी भांडण होत होते, असेही कबूल केले. संजयला शेत विकायचे होते. त्यामुळेही भांडणात भर पडत होती. भांडण आणि संजयच्या व्यसनामुळे त्याचा काटा काढल्याचे दोघांनी कबूल केले.

विटेने मारले, जबरीने विष पाजले

मृत संजयचे वडील सेवादास आणि मोठा भाऊ रामेश्वर या दोघांनी पोलिसांजवळ संजयला प्रथम विट फेकून मारल्याचे सांगितले. मात्र संजयने ती विट हुकविली. संजयची नेहमीची कटकट दूर करावी म्हणून त्या दोघांनीही किशोर आडे यांच्या शेताच्या धुऱ्यावर सेवादास यांनी संजयच्या गळ्यात शेला टाकून त्याला खाली पाडले. त्यानंतर रामेश्वरला तेथे बोलाविले. रामेश्वरने संजयचे दोन्ही हात पकडून ठेवले. सेवादासने शेतातील गोठ्यातून विषारी औषधाचा डबा आणला. त्यानंतर जबरीने संजयचे तोंड उघडून त्याला विष पाजले. त्यानंतर संजयचा गळा आवळला. सेवादास आणि रामेश्वर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल देवानंद मुनेश्वर यांनी तक्रार दिली. त्यावरून दोघांविरुद्ध भादंवि ३०२, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Forcefully poisoned a youth and faked suicide, father and son arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.