धुरा पेटविणाऱ्या तीन शेतकऱ्यांवर वन गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:59 PM2019-03-25T21:59:51+5:302019-03-25T22:00:06+5:30
तालुक्यातील आजंती खाकी येथील तीन शेतकऱ्यांना धुरा पेटविणे महागात पडले आहे. वन विभागाच्या अधिनियमानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील आजंती खाकी येथील तीन शेतकऱ्यांना धुरा पेटविणे महागात पडले आहे. वन विभागाच्या अधिनियमानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आजंती खाकी शिवारातील शेतकºयांनी सोमवारी धुरा पेटविला होता. यामुळे लगतच्या उपवनाला आग लागून मोठी वनसंपदा नष्ट झाली. शेतकºयांनी निष्काळीपणे धुरा पेटविल्याने ही आग लागली.
वनातील गवतासह इतर वनसंपदा आणि रोपटी या आगीत जळून खाक झाली. वन विभागाच्या आग नियंत्रण पथकाने ही आग आटोक्यात आणली. नेर-कारंजा रोडवरील आजंती वन परिक्षेत्रातील या घटनेने वन विभागाचे नुकसान झाले. दारव्हाचे उपविभागीय वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. मकरंद गुर्जर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तत्पूर्वी वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड व त्यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण प्राप्त केले होते.
वनपाल अनिल शिरभाते, बी.एम. नांदणे, वैशाली चिलनकार, सपना राठोड, अशोक कदम आदींनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेबाबत वन विभागाने शेतकरी गजानन चव्हाण, प्रताप चव्हाण व इतर एकाविरुद्ध वन अधिनियम १९२७ चे कलम २६/१ (ब) नुसार गुन्हा दाखल केला. तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड यांनी सांगितले.
धुरे पेटविणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे वनाधिकारी डॉ. मकरंद गुर्जर यांनी सांगितले. वनालगतचे धुरे पेटविण्यापूर्वी शेतकºयांनी वन विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. गुर्जर यांनी स्पष्ट केले.