१३ गावांना नागरी सुविधांकरिता वनजमीन
By admin | Published: July 7, 2014 11:49 PM2014-07-07T23:49:07+5:302014-07-07T23:49:07+5:30
ग्रामीण भागात नागरी सुविधांसाठी जागा उपलब्ध नसल्यास वनहक्क कायद्यांतर्गत जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात यापूर्वी या अंतर्गत २० दावे मंजूर करण्यात आले होती.
यवतमाळ : ग्रामीण भागात नागरी सुविधांसाठी जागा उपलब्ध नसल्यास वनहक्क कायद्यांतर्गत जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात यापूर्वी या अंतर्गत २० दावे मंजूर करण्यात आले होती. वणी विभागात आणखी २२ दावे मंजूर करण्यात आले आहे. सर्व दावे चराई क्षेत्रासाठी असून मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांचे क्षेत्रफळ तीन हजार ८६६ हेक्टर इतके आहे.
सामूहिक दाव्यांतर्गत चराई व तत्सम बाबीसाठी वनहक्कांतर्गत वन जमीन मंजूर करण्यात येते. वणी विभागात वारगाव, शिरपूर, कवडसी, रांगणा, सावंगी, शेवाळा, वरझडी, चारगाव, पिंपरी कायर, वडगाव थ, चिखली, भालर, पेंटुर, केसुली, चंडकापूर, येनक, पुनवट, घोपटाळा, पंचधारा, तेजापूर, कळमना खुर्द, साखरा दरा या गावांमध्ये चराईसाठी तीन हजार ८६६ हेक्टर वन जमीन मंजूर करण्यात आली आहे. त्यात केसुली या गावात ४३१ हेक्टर, शिरपूर गावात एक हजार ५० हेक्टर, शेवाळा गावात ३१९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
एखाद्या गावात सार्वजनिक सुविधांसाठी शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी सोयीसुविधा उभारण्यासाठी वनजमीन उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. या सुविधांमध्ये गावात शाळा, दवाखाना, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकान, विद्युत व दूरसंदेश वाहक तारा, पाण्याची टाकी किंवा गौण जलाशय, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व जलवाहिनी, पाणी किंवा पावसाच्या पाण्यावरील शेतीची संरचना, लहान सिंचन कालवे, अपारंपरिक ऊर्जा साधने, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रस्ते, सामाजिक केंद्र अशा १३ सुविधांचा समावेश असून त्यासाठी एक हेक्टरपर्यंत वन जमीन मंजूर करता येते.
सार्वजनिक सुविधांसाठीही वनहक्क कायद्यांचे कलम ३ (२) अंतर्गत यवतमाळ वन विभागात दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, आर्णी तालुक्यात वरूड ध. येथे विद्युत लाईन तसेच धनसिंग हेटी ते चांदापूर या रस्त्यासाठी वनजमीन मंजूर करण्यात आली आहे. पुसद वनविभागात मालेगाव ते पेवठाणा या रस्त्यासाठी, साखरा येथे शाळा, धारवाडी येथे विद्युत लाईन, फुलवाडी येथे पाणी पुरवठा पाईप लाईन, काठखेडा-वडद रस्त्यासाठी तर हौसापूर उदई येथे पाईप लाईनसाठी जमीन देण्यात आली आहे.
पांढरकवडा वनविभागात पाटणबोरी येथे आश्रमशाळा, पिंपळशेंडा येथे जिल्हा परिषद शाळा, किन्ही नंदपूर येथे स्मशानभूमी तर डोंगरगाव ते तेलंगटाकळी या गावादरम्यान वीज वाहिनी टाकण्यासाठी वन जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात २१ जुलैपर्यंत गावांमध्ये नागरी सुविधा उभारण्यासाठी वनहक्कांतर्गत दावे मंजूर करण्यासाठी प्रस्ताव स्वीकारल्या जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या पुढाकाराने विशेष कालबद्ध मोहीम राबविण्यात येत असून गावकऱ्यांनी आपले दावे या दरम्यान दाखल करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)