धनापेक्षा वन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 10:17 PM2018-07-01T22:17:08+5:302018-07-01T22:17:58+5:30

वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा असमतोल, ग्लोबल वार्मिंग आदींचा विचार केला असता आयुष्यात वन मोठे की धन मोठे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील संपूर्ण संपत्ती गोळा केली तरी सहा महिन्याचे आॅक्सिजन आपण विकत घेऊ शकत नाही.

Forests are important than coriander | धनापेक्षा वन महत्त्वाचे

धनापेक्षा वन महत्त्वाचे

Next
ठळक मुद्देमदन येरावार : आॅक्सिजन पार्क येथे वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा असमतोल, ग्लोबल वार्मिंग आदींचा विचार केला असता आयुष्यात वन मोठे की धन मोठे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील संपूर्ण संपत्ती गोळा केली तरी सहा महिन्याचे आॅक्सिजन आपण विकत घेऊ शकत नाही. मात्र झाडे आपल्याला आयुष्यभर मोफत आॅक्सिजन देतात. त्यामुळे जगण्यासाठी धना पेक्षा वन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.
शहरालगत वन विभागाच्यावतीने साकारण्यात आलेल्या आॅक्सीजन पार्कमध्ये १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य वनसंरक्षक प्र.गं.राहूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपवनसंरक्षक रमेशकुमार, डॉ. भानुदास पिंगळे उपस्थित होते. पालकमंत्री येरावार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड मोहीम एक लोकचळवळ म्हणून गावागावात रुजविली आहे. निसर्ग जोपासना व पर्यावरण समतोलासाठी राष्टÑीय वनधोरणानुसार ३३ टक्के वन आवश्यक आहे. राज्यात हे प्रमाण २० टक्के असून १३ टक्क्यांची कमतरता आपल्या भरुन काढायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आॅक्सीजन पार्कचे शहरात सुंदर नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांसाठी आवश्यक त्याबाबींची पूर्तता करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, दुष्काळ, पाणीटंचाई आपण प्रत्यक्ष अनुभवली आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड होय. गत दोन वर्षात जिल्ह्याने वृक्ष लागवडीचे चांगले उद्दीष्ट गाठले. यावर्षी जिल्ह्यात ५९.१७ लक्ष उद्दीष्ट देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी फ्री मेथॉडिस्ट इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी बोधीसत्व खंडेराव याने सीडबॉलचे महत्व सांगितले. प्रास्ताविक उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, संचालन प्रांजली दांडगे तर आभार कुशल रंगारी यांनी मानले. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांच्यासह शहरातील ४४ विविध संघटनांचे प्रतिनिधी, १२ शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Forests are important than coriander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.