मुस्लीम आरक्षणासाठी जमीयतचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:24 PM2018-11-24T21:24:21+5:302018-11-24T21:25:09+5:30
मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे येथील तिरंगा चौकात धरणे देण्यात आले. राज्य सरकारने तातडीने रद्द केलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जमियत-ए-उलेमा हिंदतर्फे येथील तिरंगा चौकात धरणे देण्यात आले. राज्य सरकारने तातडीने रद्द केलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मुस्लीम समाजाला आरक्षणाबाबत राज्य सरकार कुठलीही भूमिका स्पष्ट करत नसल्याचा आरोप जमियतचे जिल्हा सचिव मुफ्ती एजाज यांनी यावेळी केला. शिक्षण, आर्थिक, सामाजिक व देशाच्या मुख्य प्रवाहात आणून मुस्लीम समाजासाठी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली.
जस्टीस राजेंद्र सच्चर आयोग, महेमुदुर रहमान कमिटी, रंगनाथन मिश्रा आयोग आदींनी मुस्लीम समाजासाठी आरक्षण लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. तरीही या समाजाला आरक्षण लागू होत नाही, ही शोकांतिका असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
धरणे कार्यक्रमात मौलवी याकुब, मौलवी शारिक, मौलवी फजलुर्रहमान, हाफिज जुबेर, जिया मिनाई, अॅड. जयसिंग चव्हान, एमपीजेचे प्रा. सय्यद मोहसीन, अॅड. इम्रान देशमुख, डॉ. इर्शाद खान, जमील पटेल, जमियतचे शहर सचिव वसीम खान आदी सहभागी झाले होते. धरणे आंदोलनानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.