माजी आमदार बापूराव पानघाटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:19 PM2018-04-19T22:19:13+5:302018-04-19T22:19:13+5:30
वणी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार बापूराव हरबाजी पानघाटे यांचे बुधवारी रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार बापूराव हरबाजी पानघाटे यांचे बुधवारी रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
तालुक्यातील कोलगाव (साखरा) या त्यांच्या मूळ गावच्या सरपंच (१९६२-६७) पदापासून त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. त्यानंतर वणी पंचायत समितीचे उपसभापती (१९६५-६६), सभापती (१९६६-१९७२), यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य (१९७२), उपाध्यक्ष (१९७७) अशी पदे भूषवून ते १९७८ मध्ये वणी विधानसभेचे आमदार झाले. १९८५ पर्यंत त्यांनी विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर १९९० ते २००२ पर्यंत वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, तालुका खविसंचे संचालक, कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक (१९९३-९४) असा त्यांचा चढता राजकीय जीवनपट राहिला. ते येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते, तर धनोजे कुणबी संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे. येथील मोक्षधामात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र चोपणे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी मंत्री वंसत पुरके, शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, सुदर्शन निमकर, अॅड.वामनराव चटप, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, नरेंद्र ठाकरे, संजय देरकर, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. आ.बाळू धानोरकर, माजी आमदार विश्वास नांदेकर, अॅड.देविदास काळे, सुनील कातकडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. संचालन राजेश पोटे यांनी केले, तर अॅड.विनायक एकरे यांनी प्रास्ताविक केले.