माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:11 PM2020-06-09T23:11:00+5:302020-06-09T23:11:32+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यांनी भूदान यज्ञात स्वत:ला झोकून दिले होते.
यवतमाळ : गांधीवादी आणि ज्येष्ठ सर्वोदयी नेते माजी खासदार सदाशिवराव बापूजी ठाकरे यांचे मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी इंझाळा (ता.घाटंजी) या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
सकाळी ९ वाजतापर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या येथील राणाप्रतापनगरातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सदाशिवराव ठाकरे यांच्या मागे पत्नी अन्नपूर्णा, मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र, सरोज चौधरी, रागिनी गावंडे, डॉ. मंगला निकम या मुली व मोठा आप्त परिवार आहे.
सदाशिवराव ठाकरे यवतमाळचे आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचेही अध्यक्ष राहिलेले आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासूनच त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले. विद्यार्थी काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यांनी भूदान यज्ञात स्वत:ला झोकून दिले. विशेष म्हणजे, स्वकुटुंबातील ८० एकर जमीन दान दिली. भूदान पदयात्रेत प्रचंड पायपीट त्यांनी केली. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा राजकीय सहवास त्यांना लाभला. हरित क्रांतीचा पुरस्कार आणि प्रसारासाठी त्यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्राचा व्यक्ती पंतप्रधानपदी पाहणे ही अंतिम इच्छा सदाशिवराव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.
‘सिद्धांत’मधून कार्याचा लेखाजोखा
माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांनी ‘सिद्धांत’ या आत्मचरित्रात त्यांच्या राजकीय-सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला आहे. ‘पावले चालती पंढरीची वाट’ या आत्मकथेत त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय ते राजकारणातून निवृत्तीच्या निर्णयापर्यंतचे प्रवास वर्णन केले आहे.
अल्प परिचय
नाव : सदाशिवराव बापूजी ठाकरे
जन्म : १४ जून १९२५, इंझाळा, ता.घाटंजी, जि.यवतमाळ
शिक्षण : बी.कॉम. (नागपूर)
विवाह : २१ जून १९५१ (पत्नी अन्नपूर्णा)
१९६७ : यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष
१९७१ : खासदार, यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
१९७८ : यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष
१९८५ : आमदार, यवतमाळ विधानसभा मतदारसंघ
यवतमाळ जिल्ह्याचे पितृत्त्व हरविले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदाशिवराव ठाकरे आयुष्याच्या शेवटपर्यंत कमालीचे सक्रिय होते. त्यांच्यातील उत्साह व सक्रियता तरुणांनाही लाजविणारी होती. अलीकडेच झालेल्या भेटीच्यावेळी त्यांनी आपण वयाची शंभरी गाठू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. ‘काका, तुम्ही वयाची सेंच्यूरी गाठा, आपण शतकपूर्तीचा दमदार सोहळा आयोजित करू’, असे मी त्यांना सांगितले होते. परंतु क्रिकेटमध्ये शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच क्लिन बोल्ड व्हावे तसे सदाशिवराव वयाच्या ९७ व्या वर्षी आपल्यातून निघून गेले. ते संपूर्ण आयुष्य साधेपणाने जगले. विनोबाजींच्या भूदान चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या मनावर विनोबाजींचा व सर्वोदयी विचारांचा पगडा होता. ते विनोबाजींच्या चळवळीतील आठवणी नेहमीच सांगत. ते मुरब्बी राजकारणी होते. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार व्हावे, ही बाबूजींची इच्छा होती व त्यासाठी ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहायचे. सदाशिवराव खासदार असताना त्यांचे दिल्लीतील घर म्हणजे ‘लोकमत’चे कार्यालय होते. त्यांचे दर्डा परिवार आणि ‘लोकमत’ सोबत अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. आयुष्यभर त्यांनी सर्वसामान्य व गरिबांच्या विकासाचा ध्यास घेतला होता. जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांची कमालीची धडपड होती. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात पितृतूल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आधार होता. परंतु त्यांच्या निधनाने यवतमाळ जिल्ह्याचे पितृत्व हरविले आहे. त्यांची उणीव जिल्ह्याला सदैव जाणवत राहील. सदाशिवरावांचे पुत्र जितेंद्र यांच्याशी संपर्क करून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.
- विजय दर्डा, माजी खासदार तथा चेअरमन, लोकमत मीडिया प्रा.लि.