उद्धव ठाकरेंची खेळी; संजय देशमुखांचा गुरुवारी पक्षप्रवेश, संजय राठोडांविरोधात तगडे आव्हान

By विशाल सोनटक्के | Published: October 18, 2022 07:51 PM2022-10-18T19:51:40+5:302022-10-18T19:53:55+5:30

माजी राज्यमंत्री संजय देशमुख गुरुवारी बांधणार शिवबंधन, मातोश्रीवर होणार प्रवेश सोहळा.

Former state minister Sanjay Deshmukh will tie Shivbandhan at the hands by Uddhav Thackeray on Thursday | उद्धव ठाकरेंची खेळी; संजय देशमुखांचा गुरुवारी पक्षप्रवेश, संजय राठोडांविरोधात तगडे आव्हान

उद्धव ठाकरेंची खेळी; संजय देशमुखांचा गुरुवारी पक्षप्रवेश, संजय राठोडांविरोधात तगडे आव्हान

googlenewsNext

यवतमाळ : माजी राज्यमंत्री संजय देशमुख हे गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मशाल हाती घेणार आहेत. देशमुख यांच्या या प्रवेशामुळे  दारव्हा-दिग्रस मतदारसंघात चुरस वाढणार आहे. मागील काही दिवसांपासून देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू आहे. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत मागील महिन्यात अकोला येथे आले असता देशमुख यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली होती. तेव्हापासूनच देशमुख हे उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेण्याची शक्यता वर्तविली जात होती.

दिग्रस मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय राठोड यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून तुल्यबळ उमेदवार मैदानात आणला जात आहे. देशमुख यांनी १९९९ ते २००९ असे दहा वर्षे दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. दिग्रसमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. १९९९ मध्ये शिवसेनेत असताना विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांनी १२५ मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव करून विधिमंडळात प्रवेश केला.

त्यावेळी विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर २००४ मध्येही देशमुख अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत देशमुख यांनी संजय राठोड यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली. मात्र त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र भाजप-सेना युतीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोड यांच्याविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी केली. त्यावेळी त्यांना ७५ हजारांवर मते मिळाली होती. मतदारसंघातील विविध संस्थांवर देशमुख यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या प्रवेशानंतर मतदारसंघातील गणिते बदलण्याची शक्यता आहे.

Web Title: Former state minister Sanjay Deshmukh will tie Shivbandhan at the hands by Uddhav Thackeray on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.