वणीजवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जिवाष्मे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 02:54 PM2023-06-11T14:54:07+5:302023-06-11T14:54:16+5:30

मागील काही वर्षांपासून प्रा.सुरेश चोपणे हे या परिसरात संशोधन करीत आहेत.

Fossils of giant dinosaurs found near Vani | वणीजवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जिवाष्मे

वणीजवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जिवाष्मे

googlenewsNext

वणी (यवतमाळ) : तालुक्यातील विरकुंड गावाजवळ सहा कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉर या प्राण्याचे जिवाष्म सापडले असल्याचा दावा पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. 

मागील काही वर्षांपासून प्रा.सुरेश चोपणे हे या परिसरात संशोधन करीत आहेत. या संशोधनादरम्यान,  दोन वर्षांपूर्वी डायनाेसॉरच्या पायाचे एक अष्मीभूत हाड त्यांना सापडले होते. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसॉर जीवाष्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून छंद आणि अभ्यास म्हणून सर्वेक्षण करीत आहेत. यापूर्वी त्यांनी पांढरकवडा, राळेगाव व झरी तालुक्यात ६ कोटी वर्षांपूर्वीच्या शंख-शिपल्याची जिवाष्मे तर १५० कोटी वर्षांपूर्वीची स्ट्रोमॅटोलाईटची जिवाष्मे शोधून काढली आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात २५ हजार वर्षांपूर्वीची पाषाणयुगीण अवजारेसुद्धा शोधली असून हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तीगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी ठेवली आहेत.      

वणी तालुक्यातील बोर्डा-विरकुंड परिसरात निओप्रोटेरोझोईक या १५० कोटी वर्षा दरम्यानच्या काळातील पैनगंगा ग्रुपचा चुनखडक असून त्या काळात इथे समुद्र होता. जुरासिक काळात इथे विशालकाय अशा डायनोसॉर प्राण्यांचा विकास झाला. परंतु ६ कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसॉर मारले गेले. इथे बेसाल्ट या अग्निजन्य खडकाच्या रुपाने ते पुरावे आजही पाहायला मिळतात. परंतु  अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे  जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत.     विरकुंड गावाजवळ ५० वर्षांपूर्वी डायनोसॉरचा अष्मीभूत सांगाडा असावा; परंतु लोकांनी जंगलात शेती करताना येथील चुनखडक घरे बांधण्यासाठी वापरला. हाडे आणि चुनखडक दुरून सारखाच दिसत असल्याने गावकऱ्यांनी डायनोसॉरची हाडेसुद्धा घरे बांधण्यासाठी वापरली. त्यामुळे येथे पुन्हा जिवाष्मे आढळली नाहीत. ४० वर्षांपूर्वी शेतीसाठी रचलेल्या दगडी पहारीत सुरेश चोपणे याना एक जिवाष्मीकृत हाड सापडले.     जीवाश्मांच्या आकार, प्रकारावरून, स्थळावरून, काळावरून आणि भूशास्त्र विभागातील तज्ज्ञांच्या मतानुसार  हे जीवाष्म डायनोसॉरचेच  आहे, असा विश्वास चोपणे यांनी व्यक्त केला. देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असल्याने खुप जिवाश्मांचे पुरावे नष्ट झाले आहेत.    

चंद्रपूरप्रमाणे वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी, मुकुटबन हा परिसर जिवाश्मांच्या आणि प्रागैतिहासिक बाबतीत समृद्ध आहे. या परिसरात अजून जमिनीत किंवा जंगली भागात डायनोसॉरची जिवाष्मे आढळू शकतात. त्यासाठी भूशास्त्र विभागातर्फे सविस्तर सर्वे आणि संशोधन होणे गरजेचे आहे. 
-प्रा सुरेश चोपणे, संशोधक.

Web Title: Fossils of giant dinosaurs found near Vani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.