मृत वाघाचे अवयव चोरणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या, वनविभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 23:44 IST2025-01-17T23:43:57+5:302025-01-17T23:44:37+5:30

आरोपी निघाले वेकोलीचे कर्मचारी

Four arrested for stealing dead tiger's organs | मृत वाघाचे अवयव चोरणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या, वनविभागाची कारवाई

मृत वाघाचे अवयव चोरणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या, वनविभागाची कारवाई

वणी (यवतमाळ) : उकणी कोळसा खाणीत विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मृत वाघाचे सुळे दात व नखे घटनास्थळावरून लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून गुरुवारी रात्री चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चार दात आणि काही नखे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.

७ जानेवारी रोजी उकणी कोळसा खाणीतील मुख्य रस्त्यावर मृत वाघाचा सांगाडा आढळून आला होता. याची माहिती मिळताच, वणी येथील वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत वाघाचे शवविच्छेदन केले. अंदाजे तीन ते चार वर्षे वय असलेल्या या वाघाचा घटना उघडकीस येण्याच्या १२ ते १३ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. ज्या ठिकाणी वाघाचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी बोअरवेल होती. या बोअरवेलच्या डीपीचा करंट लागून त्या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. पंचनाम्याच्यावेळी वाघाचे दात आणि नखे गायब असल्याची बाबदेखील उघडकीस आली. त्यामुळे ते पळविले कुणी, याचा तपास वनअधिकाऱ्यांनी सुरू केला. तपासादरम्यान टीप मिळताच, वनविभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री संशयित आरोपी नागेश विठ्ठल हिरादेवे (वय ४०), रोशन सुभाष देरकर (२८, दोघेही रा. उकणी) व सतीश अशोक मांढरे (२६), आकाश नागेश धानोरकर (२७, दोघेही रा. वणी) यांना त्यांच्या घरून अटक केली. हे चारही आरोपी वणी तालुक्यातील निलजई कोळसा खाणीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ही कारवाई एसीएफ संगीता कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ आशिष देशमुख, क्षेत्र सहायक एस. आर. राजूरकर, वनरक्षक एस. ए. वाघ यांच्यासह वनविभागाच्या पथकाने केली.

दोघांना वनकाेठडी, तर दोघांना जामीन

या प्रकरणातील आकाश धानोरकर व सतीश मांढरे या दोघांना न्यायालयाने जामीन दिला, तर नागेश हिरादेवे व रोशन देरकर या दोघांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. वाघाचे अवयव पळविण्याच्या घटनेचा उलगडा झाला असला तरी वाघाच्या मृत्यूची जबाबदारी वनविभागाने अद्याप कुणावर निश्चित केलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एका आरोपीने दुपट्ट्याने आवळला स्वत:चा गळा

शुक्रवारी आरोपींना न्यायालयातून पुन्हा वनविभागाच्या कार्यालयात आणले असता, यातील एका आरोपीने दुपट्ट्याने स्वत:चा गळा आवळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तात्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात व तेथून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. नागेश हिरादेवे, असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने वन वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांशी या घटनेसंदर्भात संपर्क केला असता, अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Four arrested for stealing dead tiger's organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.