शिवसैनिक सुनील डिवरे हत्याकांडातील चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 10:35 AM2022-02-05T10:35:41+5:302022-02-05T10:51:32+5:30
भांबराजा येथील सरपंच महिलेचे पती सुनील डिवरे यांची मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी सकाळीही कायम होते.
यवतमाळ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच शिवसैनिक सुनील नारायण डिवरे यांची गुरुवारी सायंकाळी भांबराजा येथे घरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील प्रमुख तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासांतच अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली देशी पिस्टलही जप्त केली.
पवन प्रभाकर सोननकर (२५), वैभव प्रभाकर सोननकर (२३), रोहित राजेंद्र भोपडे (२१) रा. भांबराजा या तिघांना लोहारा येथून गुरुवारी रात्री ९.३० वाजता अटक केली. तर सुरेश चिंगोजी पात्रीकर हे पोलीस ठाण्यात शरण आले. दरम्यान, या हत्याकांडानंतर गुरुवारी रात्री भांबराजा येथील सरपंच अनुप्रिता सुनील डिवरे यांनी पतीच्या खुनाची तक्रार दिली. सात आरोपींनी संगनमत करून खून केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. भांबराजा येथील नेहरू विद्यालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक तीन वर्षांपूर्वी झाली होती.
या निवडणुकीत सुनील डिवरे यांच्याशी आरोपींनी वाद घालत जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली होती. तशी तक्रारही ग्रामीण पोलीस ठाण्यात डिवरे यांनी तेव्हा दाखल केली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीने भांबराजा येथील अतिक्रमण काढले. हे अतिक्रमण पूर्ववत लावून द्या, असे म्हणत सातही आरोपींनी हल्ला करून पतीला ठार केल्याचे सरपंच अनुप्रिता यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून ग्रामीण पोलिसांनी पवन प्रभाकर सोननकर, वैभव प्रभाकर सोननकर, रोहित राजेंद्र भोपडे, रामू किसन जयस्वाल, अमर किसन जयस्वाल, सूरज श्रावण मनवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप परदेशी, विनोद राठोड, नीलेश राठोड, बंडू डांगे, बबलू चव्हाण, सुधीर पिदूरकर, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर यांनी कारवाई केली.
तीन आरोपी पसार
आरोपींना देशी पिस्टलसह अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड व दुचाकीचा शोध घेतला जात आहे. पसार आरोपी अमर जयस्वाल याची कार (एमएच-२९-एआर-७७११) नेर येथे आढळून आली. नेर पाेलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे. गुन्ह्यातील तीन आरोपी अजूनही पसार आहे.