वाघिणीच्या दोन छाव्यांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आता मिळाले चार हत्तींचे बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 03:45 PM2018-12-18T15:45:56+5:302018-12-18T16:18:53+5:30
वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला दोन नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता यश आले आणि वाघिणीला ठार करण्यात आले.
योगेश पडोळे
यवतमाळ - वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1 कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला दोन नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता यश आले आणि वाघिणीला ठार करण्यात आले. त्यामुळे शूटिंग मोहीम ही आता वनविभागाने समाप्त केली. दोन छाव्यांना पकडण्याची आता मोहीम उरली आहे. यासाठी वनविभागाने दोन नोव्हेंबरपासूनच जंगल परिसरात गस्त लावण्याचे काम सुरू केले आहे.
वाघिणीचे हे दोन छावे दहा ते अकरा महिन्याचे असून हे केवळ ससा, बकरीचे लहान पिल्लू व लहान प्राण्यांची शिकार करू शकतात.
त्यामुळे त्यांचा शिकारीचा प्रश्न मिटला असला तरी त्यांना ट्रेनकुलाइझ करून पकडण्याची मोहीम आता वन विभाग युद्धपातळीवर राबवित आहे. या मोहिमेसाठी शंभरच्या वर वनअधिकारी व कर्मचारी फौजेसह चार हत्ती ही कामाला लागले आहेत. त्यामुळे आता या कॅप्चर छावा मोहिमेला चार हत्तींचे बळ मिळाले असून वन विभागाने मोहिमेच्या हालचाली वाढवल्या आहेत. इतकेच नव्हे तर मोहिमेसाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी अजूनही ऑन फिल्ड आहे.
मध्य प्रदेशात असलेल्या कान्हा-केसरी अभयारण्यातून वन विभागाला हे हत्ती उपलब्ध करून देण्यात आले आहे. पांढरकवडा वन परिसरात राबवण्यात येत असलेली ही मोहीम उंच-सखल भागात आहे. त्यासोबत या भागात मोठ-मोठी झुडपे वाढलेली आहे. अशा ठिकाणी पायी फिरुन छाव्यांचा शोध घेणे किंवा त्याला बेशुद्ध करणे शक्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी हत्तीच्या मदतीने छाव्यांचा शोध घेतल्या जाणार आहे. हे दोन छावे माणसांवर हल्ला करून शिकार करण्याचे तंत्र अद्यापही शिकले नाही. त्यामुळे ते मनुष्यावर हल्ला करणार नाही या दोघांना पकडण्यासाठी वन विभागाने पथकाची ही निर्मिती केली असून दिवस रात्री ही मोहीम राबवून त्यांना ट्रेनकुलाइझ करून पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.