एसटीचे चार कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
By admin | Published: January 17, 2015 12:12 AM2015-01-17T00:12:22+5:302015-01-17T00:12:22+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकावरील कारवाई टाळण्यासाठी १५ हजाराची लाच घेताना एसटी महामंडळाच्या भरारी पथकातील तीन वाहतूक निरीक्षकासह...
यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकावरील कारवाई टाळण्यासाठी १५ हजाराची लाच घेताना एसटी महामंडळाच्या भरारी पथकातील तीन वाहतूक निरीक्षकासह एक चालक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई महागाव तालुक्यातील दहीसावळी येथे शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.
अशोक किसनराव अघडते, मेहबूब खान बाबर खान, माणिक लक्ष्मण माने असे लाच घेताना अटक केलेल्या सहायक वाहतूक निरीक्षकांची तर विठ्ठल पांडुरंग बहाड असे चालकाचे नाव आहे. हे चौघेही अकोला येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्री एक वाहक राळेगाव-चंद्रपूर ही नियमित बसफेरी घेऊन जात होता. दरम्यान भरारी पथकाने ही बस थांबवून तपासणी केली. त्यामध्ये दोन प्रवासी विना तिकीट आढळून आले. यावेळी पथकातील चौघांनी याचा अहवाल वरिष्ठांना पाठवित नाही तसेच प्रकरणाचा निपटारा करून देतो, असे सांगून २० हजार रुपये लाचेची मागणी केली.
सदर वाहकाने शुक्रवारी सकाळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी शासकीय पंचाकरवी लाचेच्या मागणीची सत्यता पडताळली. त्यानंतर पथक आणि वाहकात प्रकरण निपटविण्यासाठी १५ हजारांचा व्यवहार ठरला. तसेच ही रक्कम महागाव तालुक्यातील धनोडा येथे घेऊन येण्यास सदर वाहकाला पथकाने सांगितले. ठरल्याप्रमाणे वाहक रक्कम घेऊन गेला. यावेळी पथकाच्या सुमो वाहनात वाहकाला बसवून पथकाने दोन किमी अंतरावरील दहीसावळी येथे नेले. लाचेची रक्कम स्वीकारून अहवालात फेरफार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी वाहकाने लघुशंकेचा बहाणा करून वाहनातून पाय काढला. इशारा देताच दबा धरुन बसलेल्या लाचलुचपतच्या पथकाने त्यांना रकमेसह रंगेहात अटक केली. तसेच एसटीचे सुमो वाहन (एम.एच.०६/एएल-३६७) ताब्यात घेतले. कारवाईत एसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, कर्मचारी अरुण गिरी, नरेंद्र इंगाले, प्रकाश शेंडे, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, अमित जोशी, अनिल राजकुमार, नीलेश पखाले, गजानन राठोड, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, सुधाकर कोकेवार, विशाल धलवार यांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)