चार घरांना भीषण आग, वृद्धाचा होरपळून मृत्यू
By अविनाश साबापुरे | Published: March 9, 2024 04:48 PM2024-03-09T16:48:50+5:302024-03-09T16:50:24+5:30
सिंगरवाडी येथील घटना, पुसद अग्निशमन वाहन आले धावून.
अविनाश साबापुरे, पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील सिंगरवाडी येथे ८ मार्चच्या रात्री ११:३० च्या सुमारास चार घरांना भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका ७५ वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. थावरा भोजू पवार, असे मृताचे नाव आहे.
या घटनेत सिंगरवाडी येथील सुभाष थावरा पवार, एकनाथ भिका जाधव, अनिल सीताराम पवार, केशव फकीरा राठोड यांच्या घरसदृश गोठ्याला आग लागली होती. फिर्यादी सुभाष पवार (५०) रा. सिंगरवाडी हे कुटुंबासह रात्री जेवण करून आपल्या घरात आराम करीत असताना रात्री ११:३० च्या सुमारास समोरील त्यांचे वडील राहत असलेल्या घराला भीषण आग लागल्याचे दिसले. त्यांनी व गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मात्र ते अपयशी ठरला. समोरील गोठ्यात थावरा पवार असल्याने गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुसिंग आडे, वडगाव येथील पोलीस प्रकाश चव्हाण व इतर गावकऱ्यांनी तातडीने पुसद येथील अग्निशमन विभागाच्या वाहनाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आगीला आटोक्यात आणले. मात्र या दुर्घटनेत एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे सगळ्या गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तातडीने बीट जमादार व ग्रामीण पोलीस यांच्यासह अग्निशमन विभागाची गाडी वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. ९ मार्चला सकाळी घटनेचा पंचनामा करण्याकरिता तहसीलदार महादेव जोरवर व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात मृतक थावरा भोजू पवार यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याकरिता दाखल केले. आगीचे कारण मात्र अस्पष्ट असून तहसीलच्या महसूल पथकाने तहसीलदार महादेव जोरवर यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. शासनाने पीडित कुटुंबास आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.