स्वाईन फ्ल्यूचा चारशेचा डोज तब्बल चार हजारांत
By admin | Published: March 11, 2015 01:56 AM2015-03-11T01:56:14+5:302015-03-11T01:56:14+5:30
साधा खोकला, ताप आला तरी स्वाईन फ्ल्यूची शंका येते. उपचारासाठी धावपळ सुरू होते. रुग्णाच्या याच मानसिकतेचा फायदा घेत अवघ्याचा चारशे रुपयाचा डोज चार हजारात दिला जातो.
यवतमाळ : साधा खोकला, ताप आला तरी स्वाईन फ्ल्यूची शंका येते. उपचारासाठी धावपळ सुरू होते. रुग्णाच्या याच मानसिकतेचा फायदा घेत अवघ्याचा चारशे रुपयाचा डोज चार हजारात दिला जातो. जिल्ह्यात हा प्रकार सुरू असून गैरसमज पसरवत रुग्णांना गंडविण्याचा गोरखधंदा काही डॉक्टरांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयात परिपूर्ण मोफत उपचार होऊन अनेक रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
संपूर्ण राज्यात स्वाईन फ्ल्यूची दहशत आहे. महानगरातील हा आजार ग्रामीण भागातही येऊ पोहोचला आहे. मात्र याबाबत अनेक गैरसमज जाणिवपूर्वक पसरविण्यात येत आहे. लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे पालक दक्ष असतात. मुलांना स्वाईन फ्ल्यूपासून वाचविण्यासाठी लस निर्माण झाली असल्याची बतावणी केली जात आहे. त्यासाठी पाच ते आठ हजार रुपये मोजावे लागतली असा सल्लाही दिला जात आहे. भितीपोटी अनेक नागरिक याला बळी पडत आहे. याच संधीचा फायदा घेऊन काही डॉक्टर मंडळींनी दुुकानदारीच थाटली आहे. पुणे येथून लस आणण्याचे सांगून पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे. या उलट वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या १८ संशयीत रुग्णांवर उपचार करण्यात आला. महत्वाचे म्हणजे याच रुग्णालयात कार्यरत निवासी डॉक्टर आणि स्टाफ नर्सला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात आठ दिवस भरती ठेवून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता थेट शासकीय रुग्णालयातच उपचार घ्यावा असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
खासगी रुग्णालयात प्रतिबंधक लस उपलब्ध नाही
स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधक लसीचा वापर केवळ अती जोखमीच्या वातावरणात राहणाऱ्यांसाठी केला जात आहे. शासनाकडून डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी ही लस दिली आहे. खासगीत ही लसच उपलब्ध नाही. तसेच सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तीला लस देऊनही कोणताच फायदा होत नाही. जास्त प्रोटीन असलेले पदार्थ सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढविता येते.
अशी घ्या दक्षता
पाच वर्षा आतील बाळ, ६५ वर्षावरील व्यक्ती आणि गरोदर मातांनी यांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. याशिवाय ज्यांना टीबी, दमा, रक्तदाब, किडणी, हृदयाचे आजार असलेल्या व्यक्तींनी सुध्दा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. शक्यतो हस्तांदोलन करून नये, सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तीशी संर्पक टाळावा.
ज्या व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला यासाठी अॅटीबायोटिकचा दोन दिवसांचा डोज घेऊनही आराम पडत नाही, अशाच व्यक्तीने टॅमीफ्ल्यूचा डोज घ्यावा. ज्यांना सात दिवसापेक्षा अधिक काळ खोकला, ताप, सर्दी आहे. अशा व्यक्तींना टॅमीफ्ल्यू घेण्याची गरज नाही. पहिल्या दोन दिवसानंतरही ३८ डीग्रीपेक्षा अधिक ताप असलेल्या व्यक्तीला टॅमीफ्ल्यू देणे आवश्यक आहे. ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, शरीरातील आॅक्सीजन कमी होऊन त्वचेचा रंग निळसर येतो असा रुग्ण अतिशय जोखमीत मोडतो.
- डॉ. बाबा येलके, विभाग प्रमुख औषधशास्त्र
वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय