पंतप्रधानांच्या सभेचा मंडप उभारताना चार मजूर जखमी, २६ एकरात मंडप उभारणीचे काम सुरू
By सुरेंद्र राऊत | Published: February 25, 2024 08:06 PM2024-02-25T20:06:18+5:302024-02-25T20:06:48+5:30
रविवारी सकाळी मंडप उभारणी करत असताना काही भाग काेसळला, यात ४ मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सभास्थळावर सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
यवतमाळ : जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांचा मेळावा यवतमाळात आयाेजित केला आहे. २८ फेब्रुवारी राेजी देशाचे पंतप्रधान या मेळाव्याला संबाेधित करणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ४२ एकर जागेत सभेचे नियाेजन केले आहे. येथील २६ एकरमध्ये सभामंडप उभारला जात आहे. याचे काम दिवसरात्र सुरू आहे. रविवारी सकाळी मंडप उभारणी करत असताना काही भाग काेसळला, यात ४ मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सभास्थळावर सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
मुकेश रामनाथ गुर्जर (२५) रा. राजस्थान याच्यासह चार जण जखमी झाले आहे. हे चारही मजूर ५५ फूट उंचीवर काम करता असताना अचानक मंडपाचे अॅगल खाली घसरले, त्यासाेबत मजूर जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले. मुकेश गुर्जर याला वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर तिघांना खासगी रुग्णालयात भरती केले. काही वेळानंतर मुकेश गुर्जर यालासुद्धा खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पंतप्रधानाच्या उपस्थित हाेत असलेल्या मेळाव्याला लाखाेंच्या संख्येत गर्दी हाेणार आहे.
प्रत्येक गावातून शासकीय कर्मचाऱ्यांना बचत गटाच्या महिलांना आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी नियाेजन सुरू आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व ग्रामीण जीवनाेन्नती अभियान (उमेदची) यंत्रणा कामाला लागली आहे. यासाेबतच माेठ्या प्रमाणात चाहता वर्गही येथे दाखल हाेणार आहे. त्यासाठीचे नियाेजन केले जात आहे.