फळबाग लागवडीसाठी चार लाख शेतकरी पुढे सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:50 PM2019-05-27T13:50:02+5:302019-05-27T13:52:03+5:30
कृषी क्षेत्रात नवीन बदल होत आहे. आता शेतकरी पारंपारिक पिके सोडून फळबाग लागवडीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृषी क्षेत्रात नवीन बदल होत आहे. आता शेतकरी पारंपारिक पिके सोडून फळबाग लागवडीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण राज्यात यावर्षी तब्बल चार लाख शेतकरी फळबाग लागवडीसाठी पुढे सरसावले आहे. त्यांनी आॅनलाईन प्रक्रियेतून अर्ज केले आहे. यात विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी राज्य सरकार अनुदान देते. त्यासाठी यंदा राज्यातून तब्बल चार लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. यात विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी येत्या काळात विदर्भातील शेती क्षेत्रात बदलाचे चित्र दिसणार आहे. रोपवाटिका, आंबा, डाळींब, साग, आवळा, सीताफळ, बांबू आणि इतर फळ पिकांसाठी शेतकऱ्यांनी या योजनअंतर्गत अर्ज दाखल केले. फळ बाग लागवडीसोभतच जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करणे, हरितगृह, एकात्मिक शेती साखळी, कांदा चाळ, मधुमक्षिका पालन आदींचा या योजनेत समावेश आहे.
अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची ड्रॉ पद्धतीने निवड केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर होतील, त्यांना योजनेत सहभागी होता येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचा योजनेत समावेश व्हावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. मात्र तेवढे अनुदान उपलब्ध नाही. यामुळे योजनेच्या उद्दीष्टाला मर्यादा आली आहे. या योजनेत सहभाग घेण्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आघाडीवर आहे. मात्र आता विदर्भातील शेतकरीही जागृत होत आहे. त्यांचा कल फळबाग लागवडीकडे वाढला आहे. आता या शेतकºयांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जादा अनुदान उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच विदर्भातील शेतकरी संख्येचे उद्दीष्ट वाढवून मिळावे, अश्ी विदर्भातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
विदर्भाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातून १० पट अधिक अर्ज
फळबाग लागवड योजनेसाठी विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जादा अर्ज आले. विदर्भातील बुलडणा ९०००, यवतमाळ ६०००, वाशिम ३७००, अकोला ५०००, अमरावती ५०००, भंडारा ३०००, चंद्रपूर जिल्ह्यातील ६००० शेतकऱ्यांनी अर्ज केले अहे. या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातून १० पट जादा अर्ज आले. यात सर्वाधिक आघाडीवर अहमदनगर जिल्हा आहे. तेथून तब्बल ६४ हजार अर्ज आले. औरंगाबादमधून ६० हजार, जालना ५६ हजार, नाशिक २६ हजार, सांगली १५ हजार अर्ज आले आहे. यावरून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक जागृत असल्याचे स्पष्ट होते.