चार विधानसभा मतदारसंघांना राजकीय लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 10:20 PM2019-08-08T22:20:51+5:302019-08-08T22:21:41+5:30

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांना थेट राजकीय लाभ होणार असल्याचे मानले जाते. त्यात शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघाचाही समावेश आहे.

Four legislative constituencies gain political advantage | चार विधानसभा मतदारसंघांना राजकीय लाभ

चार विधानसभा मतदारसंघांना राजकीय लाभ

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा : सर्व कंत्राट मुंबईत, स्थानिक नेत्यांवर केवळ गर्दीची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांना थेट राजकीय लाभ होणार असल्याचे मानले जाते. त्यात शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघाचाही समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी या कर्मभूमीतून आपल्या राज्यस्तरीय महाजनादेश यात्रेचा शुभारंभ केला. महाराष्ट्राचा नेता म्हणून मान्यता मिळविणे हा या मागे छुपा उद्देश असल्याचे मानले जाते. या यात्रेच्या शुभारंभाला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. तर समारोपाला खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. ५ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जिल्ह्यात दाखल झाली. महाजनादेश यात्रेचा रथ राळेगाव, यवतमाळ आणि दारव्हा या विधानसभा मतदारसंघातून फिरला. जाताना या रथाने वणी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे दोन सर्कल कव्हर केल्याचे सांगितले जाते. राळेगावात हा रथ आल्याने व मुख्यमंत्र्यांची सभा झाल्याने त्याचा अप्रत्यक्ष राजकीय लाभ शेजारील आर्णी विधानसभा मतदारसंघालाही कमी अधिक प्रमाणात होणार असल्याचे मानले जात आहे. या यात्रेत राळेगाव व दारव्हा येथील सभेला गर्दी दमदार होती. त्या तुलनेत जिल्ह्याचे मुख्यालय असूनही यवतमाळात तेवढी गर्दी पहायला मिळाली नसल्याचा राजकीय गोटातील सूर आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या महाजनादेश यात्रेत भाजपच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना केवळ कार्यकर्ते अर्थात गर्दी जमविण्याची तेवढी जबाबदारी होती. त्याचेही ‘बजेट’ जारी करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक नेत्यांवर आर्थिक बोझाही नव्हता. उर्वरित संपूर्ण कंत्राट मुंबईच्या कुण्या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीला राज्यभरात महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने दोनशे ठिकाणी होणाऱ्या सभांचे वॉटर प्रुफ मंडप उभारणे, तेथे खुर्च्या लावणे, होर्डिंग फ्लेक्स, बॅनर लावणे, रथ फिरविणे आदी संपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. या प्रत्येक सभेच्या संपूर्ण खर्चाचे बजेट २५ लाखांच्या घरात असल्याचेही सांगण्यात येते. रथ यात्रेसोबत मुंबईतून पत्रकारांच्या फौजेसह नियोजन करणारे, राबणाऱ्यांचीही चमू आणली गेली होती. मूळ रथ हा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडील असल्याचे भाजपामधूनच सांगितले गेले.
दोन टप्प्यात ही रथ यात्रा होणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पहिल्याच टप्प्यात मुख्यमंत्र्यांना ही रथ यात्रा थांबवावी लागली. आता ही रथ यात्रा पुन्हा केव्हा सुरू होणार याकडे नजरा आहेत. या रथ यात्रेने कुण्या आमदाराला आगामी निवडणुकीत नेमका काय फायदा होईल याचे अंदाज राजकीय गोटात बांधले जात आहेत. या यात्रेने शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघही ‘कव्हर’ केल्याने तेथील सेना नेत्याची मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक आणि ‘सीएमओ’तील वजन अधोरेखीत होते.
तिकडे मुंबईत भाजप-सेना मुख्यमंत्री पदावरून भांडत असताना इकडे दारव्ह्यामध्ये भाजपच्या व्यासपीठावर सेनेच्या नेत्याची उपस्थिती कशी ? यावरही राजकीय गोटात चर्चा रंगताना दिसत आहे. शिवाय या संपूर्ण यात्रेत भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कुठेच पुसटसाही उल्लेख नसल्याने भाजपातील अनेकांना ही बाब खटकली.
‘प्लास्टिक’मुळे मुख्यमंत्र्यांनी नाकारले स्वागताचे बुके
महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना स्वागतासाठी बुके देण्यात आले. मात्र प्लास्टिक बंदी असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्लास्टिकयुक्त बुके स्पष्टपणे नाकारले. प्लास्टिक लागलेले बुके आणू नका अशा सूचना आधीच दिल्या गेल्या होत्या. त्यानंतरही काहींनी प्लास्टिक कॅरिबॅग असलेले बुके आणल्याने मुख्यमंत्र्यांनी ते नाकारले. एवढेच नव्हे तर जेवणाच्या पार्सलसाठी डिस्पोजल साहित्य नको असेही बजावण्यात आले होते.

Web Title: Four legislative constituencies gain political advantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.