चार महिन्यांत २७ खून, २१ खुनाचे प्रयत्न

By admin | Published: May 20, 2016 02:01 AM2016-05-20T02:01:35+5:302016-05-20T02:01:35+5:30

जानेवारी ते एप्रिल या चारच महिन्यात जिल्ह्यात खुनाच्या तब्बल २७ घटना घडल्या आहेत. २१ जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.

In four months 27 murders, 21 assassination attempts | चार महिन्यांत २७ खून, २१ खुनाचे प्रयत्न

चार महिन्यांत २७ खून, २१ खुनाचे प्रयत्न

Next

जानेवारी ते एप्रिल २०१६: १२ महिलांचाही घेतला जीव, मारहाणीचे गुन्हे वाढले, दुखापतीच्या ४७४ नोंदी
यवतमाळ : जानेवारी ते एप्रिल या चारच महिन्यात जिल्ह्यात खुनाच्या तब्बल २७ घटना घडल्या आहेत. २१ जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरून शरीरासंबंधीच्या गुन्हेप्रकारात वाढ झाल्याचे दिसून येते.
सन २०१६ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला असता अनेक गुन्हेप्रकारात वाढ झाल्याचे दिसून आले. या चार महिन्यात खुनाच्या २७ घटना घडल्या. खुनाचा प्रयत्न २१, सदोष मनुष्यवध एक, बलात्कार ३१, दरोडा दोन, जबरी चोरी २३, दिवसाघरफोडी १६, रात्री घरफोडी ६४, चोऱ्या ३२३, दंगा ६८, अफरातफर १०, धोका ४०, अपहरण ५५, दुखापत ४७४, विनयभंग १२७, शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ला ३६, विवाहितांच्या आत्महत्या ६, इतर आत्महत्या ११, अपघाती मृत्यूचे १०३ असे एकूण जिल्ह्यात १ हजार ८०७ गुन्हे दाखल झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, दरोडा, सायकल चोरी या सारख्या गुन्ह्याचे शंभर टक्के डिटेक्शन झाले आहे. सन २०१५ मध्येसुद्धा खून, खुनाचा प्रयत्न या प्रकारात यावर्षी एवढ्याच गुन्ह्यांची नोंद झाली होती. ही आकडेवारी पाहता खून व खुनाचा प्रयत्न हे गुन्हे गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याचा दावा पोलिसांकडून फेटाळला जात आहे. एकूणच दाखल गुन्हे बघता शरीरासंबंधीचे अर्थात मारहाणीचे गुन्हे वाढल्याचे दिसून येते. या गुन्ह्यांचे डिटेक्शन मात्र बहुतांश शंभर टक्के आहे.
मे महिन्यातही अनेक गुन्हे
मे महिन्यात गेल्या १७-१८ दिवसातसुद्धा खुनाचे पाच ते सहा गुन्हे घडले आहेत. खुनाचा प्रयत्न, शस्त्राने भोसकण्याच्या घटनांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. वाटमारी, जबरी चोरी, धाडसी घरफोडी, चोरीचेही डझनावर गुन्हे नोंदविले गेले. त्यात लाखोंचा ऐवज लंपास केला गेला. मात्र बहूतांश प्रकरणातील चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
पोलिसांची ‘कामगिरी’
गेल्या चार महिन्यात पोलिसांनी दारू, जुगारासह अन्य दोन हजार ४९१ गुन्हे नोंदविले आहे. त्याचे डिटेक्शन ९९ टक्के आहे. त्यात दारुच्या केसेस कमी झाल्या तर जुगाराच्या वाढल्या आहेत. चार महिन्यात पोलिसांनी तब्बल तीन हजार ६९४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत मात्र त्यात ७३२ ने घट झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

मालमत्तेच्या गुन्ह्यांचे डिटेक्शन केवळ ३० टक्के
गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात घरफोडीच्या ८० तर चोरीच्या ३२३ गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. दरोडा, जबरी चोरीचे गुन्हेही नोंदविले गेले आहे. या चोऱ्यांमध्ये एकूण दोन कोटी ११ लाख ३९ हजार ७५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. मात्र हे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना पाहिजे तसे यश मिळालेले नाही. पोलिसांना घरफोडीच्या केवळ ३० टक्के तर चोरीच्या ३१ टक्के गुन्ह्यांचे डिटेक्शन करता आले. ८० पैकी केवळ २४ घरफोड्यांचा तपास लागला. जबरी चोरीच्या २३ घटना घडल्या. मात्र त्यापैकी केवळ सहा गुन्ह्यातील आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले. यावरून अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळण्यात पोलीस ठाण्यातील डीबी पथके, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथके सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते. सामान्य नागरिकांचे तर दूर लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठीतांच्या घरी झालेल्या चोऱ्यांचाही पोलिसांना तपास लावता आलेला नाही.

महिलांवरील अत्याचाराचे ३३० गुन्हे
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात महिलांवरील अत्याचाराचे तब्बल ३३० गुन्हे दाखल झाले आहेत. ते सर्व उघडकीसही आले. गतवर्षीच्या तुलनेत महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात २४ ने घट झाल्याचे दाखविले गेले. चार महिन्यात १२ महिलांचा खून झाला. तर आठ महिलांच्या खुनाचा प्रयत्न केला गेला. सुदैवाने डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला. एक महिला हुंडाबळी ठरली. पती व सासरच्या मंडळीकडून होणारी पैशाची मागणी, चारित्र्यावरील संशय, कौटुंबिक कलह यातून पाच महिलांनी जीवन यात्रा संपविली. या प्रकरणात त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला गेला. ७७ महिलांच्या फिर्यादीवरून त्यांच्या पती व सासरच्यांविरुद्ध शारीरिक, मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला गेला. चार महिन्यात बलात्काराचे ३१, विनयभंगाचे १२७ तर महिला-मुलींच्या अपहरणाचे ४४ गुन्हे नोंदविले गेले. अश्लील शिवीगाळ-हावभाव केल्याप्रकरणी २५ गुन्हे दाखल आहे. महिलांचे खून, खुनाचा प्रयत्न, छळ, बलात्कार, अपहरण या गुन्हे प्रकारात मात्र वाढ झाली आहे.

Web Title: In four months 27 murders, 21 assassination attempts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.