प्रवाशाची चार लाखांची चोरी होऊनही ‘एसटी’ बेजबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:43 PM2018-06-24T22:43:21+5:302018-06-24T22:43:37+5:30
चार लाख रुपये असलेली पिशवी चोरी गेल्याचे सांगूनही बस पोलीस ठाण्यात नेण्याचे टाळल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने ‘एसटी’ला दणका दिला. महिला वाहकाचा बेजबाबदारपणा महामंडळाला भोवला. महामंडळाने प्रवाशाला भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अॅड.आश्लेषा दिघाडे आणि रमेशबाबू सिलिवेरी यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चार लाख रुपये असलेली पिशवी चोरी गेल्याचे सांगूनही बस पोलीस ठाण्यात नेण्याचे टाळल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने ‘एसटी’ला दणका दिला. महिला वाहकाचा बेजबाबदारपणा महामंडळाला भोवला. महामंडळाने प्रवाशाला भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अॅड.आश्लेषा दिघाडे आणि रमेशबाबू सिलिवेरी यांनी दिला आहे.
आकपुरी (ता.यवतमाळ) येथील मंगेश जयवंत भोयर आणि लक्ष्मीबाई जयवंत भोयर यांनी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे. २७ आॅगस्ट २०१२ रोजी सदर दोघे घाटंजी येथे जाण्यासाठी बसमध्ये बसले. दरम्यान, जवळ असलेली चार लाख रुपयांची पिशवी चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. कारेगाव ते वडगाव दरम्यान हा प्रकार घडल्याचे त्यांनी बसच्या महिला वाहकाला सांगितले. बस वडगाव पोलीस ठाण्यात नेण्याची विनंती केली. मात्र महिला वाहकाने त्यांची विनंती नाकारत थांब्यावर बस थांबविली. त्यावेळी याठिकाणी बरेच प्रवासी उतरले.
यानंतरही सदर बस वडगाव पोलिसात न नेता घाटंजी येथे नेण्यात आली. याठिकाणी पोलीस ठाण्यात बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वेळ निघून गेली होती. पैसे चोरी गेल्याची तक्रार वडगाव (जंगल) पोलीस ठाण्यात करण्यात आली. तसेच एसटी महामंडळाकडेही भरपाईची मागणी केली. परंतु महामंडळाने ही जबाबदारी झिडकारली. अखेर भोयर यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. कारवाई दरम्यान महामंडळातर्फे संबंधितांची सातत्याने गैरहजेरी होती. या प्रकरणात निकाल देताना मंचाने म्हटले आहे, बसमधील प्रवाशांच्या जीविताची व मालमत्तेची काळजी घेणे बसचालक व वाहकाची जबाबदारी असते. असे असतानाही सदर प्रकरणात बसवाहकाने जबाबदारी पार पाडल्याचे दिसून येत नाही. बसवाहकाने त्रूटीपूर्ण व्यवहार करून प्रवाशाला सदोष सेवा दिली. महामंडळाने तक्रारकर्ते भोयर यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी पाच हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे दोन हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचाने दिला आहे.