गुजरातमधील चौघांनी आर्णीतील व्यापाऱ्याला घातला दीड लाखाचा गंडा
By विशाल सोनटक्के | Published: August 18, 2023 05:34 PM2023-08-18T17:34:23+5:302023-08-18T17:34:48+5:30
आर्णी ठाण्यात गुन्हा दाखल
यवतमाळ : ऑनलाइन खरेदी करताना दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे. याबाबत प्रशासनाकडूनही जनजागरण करण्यात येत असले तरी फसवणुकीच्या घटना वाढतच आहेत. फ्रीजरसाठी ऑनलाइन व्यवहार केलेल्या एका व्यापाऱ्याला गुजरातमधील चौघांनी सुमारे दीड लाखाचा गंडा घातल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी आर्णी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नरसिंग थावरा जाधव असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांची आर्णीतील जवळा येथे एन. टी. जाधव नावाने दूध डेअरी आहे. डेअरीमध्ये दुधाचा संग्रह करण्यासाठी त्यांना फ्रीजरची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगरमधील डणताल कोलाल येथील विकास पटेल यांच्यासह तिघांशी संपर्क साधला. यावर दर्जेदार फ्रीजरसाठी पटेल यांनी एक लाख ५३ हजार रुपये फोन पेवरून मागवून घेतले.
जाधव यांनी पैसे पाठवूनही त्यांना फ्रीजर मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी गुजरातमधील पटेल यांना वारंवार फोन केला असता, पटेल यांचा नंबर राँग असल्याचे सांगण्यात येऊ लागले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी आर्णी ठाण्यात धाव घेतली. यावरून विकास पटेलसह गुजरातमधील चार भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.