धामणगाव रोडवर चौघांना लुटले
By admin | Published: May 20, 2016 02:02 AM2016-05-20T02:02:11+5:302016-05-20T02:02:11+5:30
येथील धामणगाव मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनसमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी चौघांना लुटल्याची घटना घडली.
मध्यरात्रीची वाटमारी : १७ हजार लंपास, ‘नानू’ टोळीचा धुडगूस, दोन अल्पवयीनांचा समावेश
यवतमाळ : येथील धामणगाव मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनसमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी चौघांना लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी १७ हजार रुपये रोख व मोबाईल लंपास केले. दरम्यान या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच चार्ली पथकाच्या मदतीने अवघ्या काही तासातच वाटमारी करणाऱ्या चौघांनाही अटक केली.
यवतमाळच्या मैथिलीनगरात राहणारे नंदू लहुजी आदबाने (५२) हे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेतातून आपल्या घरी जात होते. धामणगाव मार्गावर त्यांची दुचाकी चौघांनी अडविले. शस्त्राच्या धाकावर त्यांच्याजवळील रोख व मोबाईल लंपास केला. याच पाठोपाठ स्वप्नील, दीपक, कपिले या तीन तरुणांनाही अडवून मारहाण करीत त्यांच्याजवळून ऐवज लुटला. या प्रकाराने घाबरलेल्या चौघांनी तत्काळ यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ चार्ली पथकाच्या मदतीने शोध सुरू केला. तेव्हा एका दुचाकीवर पहाटे ४.३० वाजता रविदासनगरातून चौघे जण पळून जाताना आढळून आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नानू उर्फ कार्तिक सुरेश दांडेकर (२३) रा. रवीदासनगर, अक्षय गजानन चौधरी (२०) रा. चमेडियानगर आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून घटनेत वापरलेली दुचाकी क्र.एम.एच.२९-एएस-७८२८ जप्त करण्यात आली. नानू दांडेकर हा या घटनेचा मुख्य सूत्रधार असून त्याच्यावर अनेक चोरीचे गुन्हेही दाखल आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, विनोद राठोड, गुणवंत गोईनवार, महेश मांगूळकर यांनी केली. यवतमाळ शहरात झालेल्या या वाटमारीने एकच खळबळ उडाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)