पुसद येथे चार दुकाने आगीत भस्मसात, एक कोटींंची हानी

By Admin | Published: August 20, 2016 12:08 AM2016-08-20T00:08:16+5:302016-08-20T00:08:16+5:30

येथील मुख्य बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीत चार दुकाने भस्मसात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Four shops were burnt by fire in Pusad, a loss of one crore | पुसद येथे चार दुकाने आगीत भस्मसात, एक कोटींंची हानी

पुसद येथे चार दुकाने आगीत भस्मसात, एक कोटींंची हानी

googlenewsNext

मुख्य बाजारपेठेतील घटना : पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात
पुसद : येथील मुख्य बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीत चार दुकाने भस्मसात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
मुख्य बाजारपेठेतील नगिना चौकातील मोहंमद आसीफ मो.इकबाल यांचे डायमंड शूज सेंटर, वसीम अहमद यांचे सीटी कलेक्शन हे कापड दुकान, मोहंमद शफीक अब्दूल रशीद यांचे बेन्टेक्स ज्वेलरीचे सिंगार नॉव्हेल्टी दुकान आणि आशीर्वाद ड्रेसेस ही चार दुकाने बेचिराख झाली. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मुख्य बाजारपेठेतून धूर निघताना दिसला. हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी ठाणेदार गजानन शेळके यांना माहिती दिली. शेळके यांनी पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ व वाशिम येथील अग्नीशमन विभागाशी संपर्क साधला. उमरखेड येथील अग्नीशमन दल पुसद तालुक्यातील कारला देव येथे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या बंदोबस्तासाठी आले होते. त्यामुळे ते काही वेळातच घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर पुसद येथील अग्नीशमन दल घटनास्थळी आले. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. दिग्रस, दारव्हा येथील अग्नीशमन दलही येऊन पोहोचले. तब्बल पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
या आगीत डायमंड शूज सेंटरचे ३० लाख, सीटी कलेक्शन ३० लाख, सिंगार नॉव्हेल्टीचे १४ लाख असा ७४ लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला. तर आशीर्वाद ड्रेसेसमध्ये किती नुकसान झाले हे कळू शकले नाही. त्यांचेही २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद मनवर, तहसीलदार डॉ. संजय गरकल, ठाणेदार गजानन शेळके आदी दाखल झाले होते. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीने पुसद शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करीत आहे. (प्रतिनिधी)

घातपाताचा संशय एक ताब्यात
मुख्य बाजारपेठेतील या आगीमागे भाऊबंदकीचा वाद असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शहर ठाणेदार गजानन शेळके यांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी कुणाची तक्रार आल्यास गुन्हा नोंदविण्यात येईल, असे ठाणेदार गजानन शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Four shops were burnt by fire in Pusad, a loss of one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.