सहा पैकी चार विधानसभा क्षेत्र शिवसेनेला पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:58 PM2018-05-11T23:58:07+5:302018-05-11T23:58:07+5:30

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेला विजय सहज शक्य होईल, अशी माहिती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील आढावा बैठकीत दिली.

Four of the six assembly constituencies are in the nucleus of the Shivsena | सहा पैकी चार विधानसभा क्षेत्र शिवसेनेला पोषक

सहा पैकी चार विधानसभा क्षेत्र शिवसेनेला पोषक

Next
ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा : उद्धव ठाकरेंकडून नागपुरात आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेला विजय सहज शक्य होईल, अशी माहिती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील आढावा बैठकीत दिली.
शिवसेना पक्ष प्रमुख शुक्रवारी नागपुरात आले. त्यांनी विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. दुपारी ३.३० वाजता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठीची आढावा बैठक पार पडली. यावेळी या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार, खासदार, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, माजी आमदार आदी उपस्थित होते. सुमारे २५ मिनिटे ही बैठक चालली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दिग्रस, यवतमाळ, वाशिम व कारंजा येथे शिवसेनेला पोषक वातावरण आहे.
तर राळेगाव व पुसद मतदारसंघात आणखी परिश्रम करून संघटन बांधणी करावी लागणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सहापैकी एकाच मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु पोषक वातावरण व त्याला परिश्रमाची साथ लाभल्यास शिवसेनेच्या आमदारांची संख्या एक वरून चार वर जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिवाय लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात कायम ठेवण्यासही यश येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
शिवसेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी गटातटात गुंतून न राहता पक्षासाठी एकजुटीने काम करावे आणि शिवसेनेची ताकद वाढवावी, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्या.
शिवसैनिकांनो, कामाला लागा
आगामी लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार असेल, कुणाचे तिकीट पक्के होणार याचा विचार न करता शिवसैनिकांनी पक्षासाठी कामाला लागावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केले. आमदार-खासदारांनीही जनतेच्या कामांवर भर द्यावा, कार्यकर्त्यांनी ही कामे करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दोन्ही नेत्यांमधील वाद मिटविणार
महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील वादाकडे एका पदाधिकाºयाने बैठकीत उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची भक्कम ताकद आहे. नेत्यांमधील वाद मिटल्यास ही ताकद आणखी वाढेल, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद राहणार नाही, वाद असतील तर ते आपण स्वत: मिटवू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

Web Title: Four of the six assembly constituencies are in the nucleus of the Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.