काळी येथील खूनप्रकरणात चार संशयितांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 05:00 AM2021-12-05T05:00:00+5:302021-12-05T05:00:07+5:30
या प्रकरणात लक्ष्मण शेषराव राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख सादिक ऊर्फ सादर मन्सूर अली (४२), सय्यद कलीम सय्यद हाफीज (२८), मनू ऊर्फ सिराजोद्दीन ऊर्फ सबीरोद्दीन वाहबोद्दीन (२०), मुकीमोद्दीन रफीकोद्दीन सर्व रा. काळी यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून तलवार व चाकू हस्तगत केला. आरोपींना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव/पुसद : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात श्याम राठोड या तरुणाचा खून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी काळीदौलत येथे घडलेल्या या घटनेनंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे रात्रीपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, मारेकऱ्यांना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा श्यामच्या नातेवाइकांनी घेतला. अखेर, शनिवारी चार संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणात लक्ष्मण शेषराव राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख सादिक ऊर्फ सादर मन्सूर अली (४२), सय्यद कलीम सय्यद हाफीज (२८), मनू ऊर्फ सिराजोद्दीन ऊर्फ सबीरोद्दीन वाहबोद्दीन (२०), मुकीमोद्दीन रफीकोद्दीन सर्व रा. काळी यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून तलवार व चाकू हस्तगत केला. आरोपींना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काळीदौलतच्या बसस्थानक परिसरात दुचाकीवर निघालेल्या श्याम शेषराव राठोड याला अडवून काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्यातच श्यामचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद परिसरात उमटले. ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका वाढला होता. हा धोका ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळी पोहोचून जनतेला शांततेचे आवाहन केले.
तर, दुसरीकडे श्यामचे नातेवाईक संतप्त झाले होते. गावातील काही जणांनी बसस्थानक परिसरात जाळपोळही केली. दोन गटांत दंगा भडकण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, शुक्रवारी रात्री लवकरच काळीदौलत व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका श्यामच्या नातेवाइकांनी घेतली. शनिवारी दुपारी श्यामचा मृतदेह काळीदौलतखान येथे आणला होता. मृतदेह चौकात ठेवून आरोपीच्या अटकेची जोरदार मागणी करण्यात आली. त्यामुळे गर्दी वाढून आणखी परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती उपस्थित नागरिकांना दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर श्यामच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले.
संवेदनशील काळी येथे हवे पोलीस ठाणे
- काळी दौलतखान हे गाव यापूर्वीच पोलीस दप्तरी संवेदनशील म्हणून नोंदविले गेले आहे. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या या गावात पोलीस चौकी देण्यात आली आहे. मात्र, गाव संवेदनशील असल्यामुळे व येथील बाजारपेठही मोठी असल्यामुळे पोलीस ठाणे देण्याची मागणी आहे. श्याम राठोड हा घरातील कर्ता तरुण होता. वडील यापूर्वीच मृत्यू पावले आहे. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी श्यामवर असताना तोही पोलीस भरती व अन्य नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. त्याच्या अचानक जाण्याने राठोड कुटुंबावर आघात झाला आहे. शुक्रवारच्या घटनेत जखमी झालेला भाऊ लक्ष्मण उपचार घेत आहे. तर, बहीण आई वनिताला धीर देण्याचा प्रयत्न करीत आहे.
डीआयजींसह आमदारांनी घेतली धाव
- घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अमरावती परिक्षेत्राचे डीआयजी चंद्रकिशोर मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, उपविभागीय अधिकारी डाॅ. व्यंकट राठोड, माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड, आमदार इंद्रनील नाईक, आमदार ॲड. नीलय नाईक, जिल्हा परिषद सदस्य अशोक जाधव, दौलत नाईक, गुलाब जाधव, अनिता चव्हाण, सरपंच नीशा संतोष राठोड, भिकन राठोड, हंसराज मोरे, दिनेश राठोड, इंदल राठोड, नरेंद्र जाधव, मोहन चव्हाण, राम राठोड, सुनील टेमकर यांच्यासह अनेकांनी परिस्थिती हाताळण्यासाठी शांततेचे आवाहन केले.