विषबाधा रोखण्यासाठी चार हजार अँटी डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:03 PM2019-08-24T12:03:00+5:302019-08-24T12:05:21+5:30
फवारणीच्या विषबाधेचे प्रमाण राज्यभरात वाढत आहे. अशा स्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांचे प्राण वाचविण्यासाठी पाम इंजेक्शनचे अँटी डोज राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांकडे पाठविण्यात आले आहेत.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विषबाधा रोखण्यासाठी अँटी डोजचे पाम इंजेक्शन, विविध दुर्धर आजार, तसेच दैनंदिन लागणाऱ्या २०० कोटींच्या औषधी ‘हाफकिन’ने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना पुरविल्या आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड थांबणार आहे.
फवारणीच्या विषबाधेचे प्रमाण राज्यभरात वाढत आहे. अशा स्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांचे प्राण वाचविण्यासाठी पाम इंजेक्शनचे अँटी डोज राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये ४००० इंजेक्शन यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले. या महाविद्यालयांना इतक्या मोठ्या प्रमाणात या औषधी प्रथमच पुरविण्यात आल्या आहेत. यासोबतच दुर्धर आजारावरील औषधी आणि दैनंदिन औषधांचा पुरवठाही हाफकिनने १६ वैद्यकीय महाविद्यालयांना केला आहे. आता रुग्णांना औषधांसाठी खासगी दुकानांमध्ये धाव घ्यावी लागणार नाही. बहुतांश औषधी वैद्यकीय महाविद्यालयातच उपलब्ध होणार आहे. यामध्ये टीटी, आयव्ही, रक्त तपासणी किट यासारख्या महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.
इतर जिल्ह्यांची यवतमाळकडे धाव
विषबाधा प्रकरणात यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाने स्वतंत्र कक्ष उघडला आहे. १० आयसीयू युनिट येथे तयार करण्यात आले असून पाच तज्ज्ञ डॉक्टरांची चमू तेथे तैनात करण्यात आली. गत तीन वर्षात ७२२ रूग्णांचे प्राण या वैद्यकीय महाविद्यालयाने वाचविले आहे. फवारणी बाधितांचा आकडा मोठा आहे. यामुळे विदर्भातील इतर जिल्ह्यातून विषबाधीत रूग्ण यवतमाळकडे रेफर केले जात आहेत. यामध्ये किनवट, नांदेड, वाशिम जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.
दोन औषधांवर बंदीचा प्रस्ताव
शेतकरी फवारणी करताना गॅस पॉयझन औषधांचा वापर करीत आहे. या औषधांमुळे श्वासातून आणि त्वचेतून शरीरात विष पोहचल्याने विषबाधा होत आहे. अशा औषधांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला पाठविला आहे.
विषबाधा, दुर्धर आजार, दैनंदिन औषधींचा पुरवठा राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना करण्यात आला आहे. २०० कोटी रुपयांच्या या औषधी महाविद्यालयात पोहचल्या आहेत. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील औषध टंचाईचा प्रश्न सुटणार आहे.
- डॉ. राजेश देशमुख, संचालक, हाफकिन, मुंबई