मोदींच्या सुरक्षेसाठी साडेचार हजार पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:29 PM2019-02-14T22:29:41+5:302019-02-14T22:30:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून पांढरकवडा शहराचा जणू सुरक्षा व प्रशासकीय यंत्रणेने ताबा घेतल्याचे चित्र आहे. साडेचार हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी येथे दाखल झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून पांढरकवडा शहराचा जणू सुरक्षा व प्रशासकीय यंत्रणेने ताबा घेतल्याचे चित्र आहे. साडेचार हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी येथे दाखल झाले आहे.
शनिवारी येथील रामदेवबाबा ले-आऊटमधील २८ एकर जागेवर स्वयं सहाय्यता समुहाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने कार्यक्रमस्थळाचा व संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आहे. अमरावतीचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे, नागपूरचे पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस अधिकाºयांची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये याची दक्षता घेतली जात आहे. इंटेलिजन्सचे १८ अधिकारी येथे दाखल झाले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहराचा व परिसराचा फेरफटका मारला. गुरूवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीसुद्धा कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. कार्यक्रमस्थळाच्या जवळच पाच हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी या ठिकाणी पाच हेलिकॉप्टर उतरणार आहेत. पंतप्रधानांसोबत राज्यपाल के.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आदींचे हेलीकॉप्टरने आगमन होणार आहे.
लॉज, हॉटेल, मंगल कार्यालये झाली हाऊसफुल्ल
पंतपधानांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या वाहनांची शहरात गर्दी गर्दी झाली असून पार्किंगसाठीसुद्धा जागा शिल्लक नाही. शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज, मंगल कार्यालये हाऊसफुल्ल झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी येथे असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे व मित्रांकडे राहण्याची व्यवस्था केली आहे. पांढरकवडाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात.