पत्नीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यास चार वर्षे कारावास
By admin | Published: April 7, 2017 02:18 AM2017-04-07T02:18:00+5:302017-04-07T02:18:00+5:30
पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी गुरुवारी चार वर्ष सक्षम कारावास
यवतमाळ : पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी गुरुवारी चार वर्ष सक्षम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
आरोपी भगवान निकम (३५) रा. वेदधारणी नगर, यवतमाळ याला दारूचे व्यसन होते. यातूनच तो त्याची पत्नी योगीता भगवान निकम हिला मारहाण करून त्रास देत होता. अशातच ३ मे २०१५ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास भगवान निकमचे पत्नीसोबत जेवणाच्या कारणावरून भांडण झाले. त्यानंतर योगीता झोपी गेल्यानंतर भगवानने बॉटलमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला जाळले. तिचा आरडा-ओरडा ऐकूण मुलगा जागी झाला. त्याने शेजारच्यांच्या मदतीने आईला रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात योगीताचे मृत्यूपूर्व बयाण महत्वाचे ठरले. या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी व जखमी योगिता निकम, डॉ. जयदीप सानप, घरमालक गोविंद बिजवे, पांडुरंग काळे, तापस अधिकारी आदींच्या साक्षी न्यायालयाने ग्राह्य धरल्या. त्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी भगवान निकम याला चार वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. विजय तेलंग यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)