चौदाव्या वित्त आयोगाचा ६० टक्के निधी अखर्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:28 PM2018-03-31T22:28:05+5:302018-03-31T22:28:05+5:30
गावाच्या विकासासाठी दिला जाणारा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी योग्य नियोजनाअभावी परत जाण्याची शक्यता वाढली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेली चालढकल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : गावाच्या विकासासाठी दिला जाणारा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी योग्य नियोजनाअभावी परत जाण्याची शक्यता वाढली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेली चालढकल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील केवळ ४० टक्के निधी खर्च झाला आहे.
प्रतिव्यक्ती ४०९ रुपये याप्रमाणे गावाला चौदाव्या वित्त आयोगातून निधी दिला जातो. ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये रक्कम टाकली जाते. ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार या निधीतून कामे हाती घेतली जातात. एक हजार लोकसंख्येच्या गावाला चार लाख नऊ हजारांचा निधी प्राप्त होतो. मात्र हा निधी खर्च करण्यास अधिकाºयांकडे कुठलेही नियोजन नाही. परिणामी गावाच्या विकासाला खीळ बसला आहे.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी तालुक्यातील ग्रामपंचायतींना मिळाला. आरोग्य, शिक्षण, रोजगार, घनकचरा, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या नाल्या आदी सुविधांसाठी हा निधी वापरला जावू शकतो. यासाठीचे नियोजन मात्र केले जात नाही. कामाचे नियोजन आणि खर्चाविषयी चर्चेसाठी दर १५ दिवसांनी बैठक घेणे अपेक्षित आहे. याकडे दुर्लक्ष केले गेले.
महिला बालकल्याण, मागासकल्याण क्षेत्र, दिव्यांग आदींसाठी या निधीतून कामे अथवा मदत अपवादानेच झाली आहे. ग्रामीण रस्ते, आरोग्य या समस्या भीषण झाल्या आहे. निधी असूनही केवळ दुर्लक्ष झाल्याने लाखो रुपये ग्रामपंचायतींच्या खात्यात पडून आहे. तालुक्यात या योजनेची पुरती वाट लागली आहे. गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा योग्य उपयोग व्हावा, अशी अपेक्षा आहे.
पाणीटंचाई उपाययोजनासुद्धा नाही
नेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. गावासह शेतशिवारातील जलस्त्रोत आटले आहे. टँकरवर तहान भागवावी लागत आहे. ग्रामपंचायतींकडे पैसा आहे. मात्र कारणांचा पाढा वाचत टंचाई दूर करण्यात चालढकल केली जात आहे. अशावेळी निधीचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.