बोगस बीटी बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:51 AM2021-04-30T04:51:31+5:302021-04-30T04:51:31+5:30
महागाव : तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांची दरदिवशी लाखोंची उलाढाल होते. कृषी विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे बोगस बियाणे ...
महागाव : तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांची दरदिवशी लाखोंची उलाढाल होते. कृषी विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे बोगस बियाणे विक्रीतून शेतकऱ्याची फसवणूक होत आहे. हे बियाणे प्रमाणित असेल, तर कृषिसेवा केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना पक्के बिल देण्यास काय हरकत आहे, असा सवाल ‘अमृत’ पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
बोगस बियाणे असल्याने विक्री होणाऱ्या कापूस बियाण्यांच्या बॅगवर उत्पादनाचे ठिकाण, बॅच नंबर, दर, वजन, पॅकिंग केल्याची तारीख आदी कुठल्याही नोंदी दिसत नाहीत. या बियाण्यांचे पक्के बिल दिले जात नाही. तालुका कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोणत्याही प्रकारे जनजागृती करीत नाही. बियाण्यांमुळे फसगत झाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही.
बीटी-थ्री बियाण्याची मागणी वाढली आहे. त्याचा लाभ कंपन्या घेत आहे. प्रमाणित बियाणे घ्यायला हरकत नाही. परंतु, अप्रमाणित बियाणे बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. शेतकरी मिळेल ते बियाणे विकत घेतो. त्या संधीचा फायदा कृषिसेवा केंद्र संचालक घेत आहेत.
कृषी हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ११९ कंपन्या राज्यातील बाजारात उतरल्या आहेत. त्यातील अनेक अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची विक्री करीत असल्याची माहिती आहे. कमी दरात हे बियाणे मिळत असल्याने शेतकरीही याच बियाण्यांची खरेदी करतात. सध्या संचारबंदीचा लाभ उठवून कंपन्यांचे प्रतिनिधी चक्क उधारीत बियाणे विकत आहेत. त्यामुळे स्वतंत्र पथकाद्वारे यावर नियंत्रणाची गरज आहे.
बॉक्स
महागावात बनले अड्डे
दोन वर्षांपूर्वी महागाव, फुलसावंगी, हिवरा, गुंज, काळी दौलत आदी ठिकाणी बोगस बियाणे विक्रीचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतरही बाजारात फारसा फरक पडला नाही. यंदाही बोगस बीटी बियाणे बाजारात आल्याची माहिती आहे. महागावमध्ये काही प्रमुख कृषिसेवा केंद्रे त्याचे प्रमुख अड्डे बनले आहेत. अशा कृषिसेवा केंद्र संचालकांचा शोध घेऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई आवश्यक असल्याचे मत ‘अमृत’ पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी व्यक्त केले तसेच कृषिसहायकांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योग्य ती माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
बोंडअळी व्यवस्थापनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकताच आढावा घेण्यात आला. कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, बोंडसड व्यवस्थापनबाबत कृषितज्ज्ञ अद्याप स्पष्टपणे काहीही सांगू शकले नाही. कृषी विद्यापीठाचे अधिकारी ‘अमृत’ पॅटर्न मानायला तयार नाही. एवढेच काय तर जिल्ह्याच्या बैठकीचे साधे निमंत्रणही दिले जात नाही.
अमृतराव देशमुख, अमृत पॅटर्न जनक