वणीसाठी प्रवेशाचे स्वतंत्र वेळापत्रक

By admin | Published: June 26, 2017 12:50 AM2017-06-26T00:50:56+5:302017-06-26T00:50:56+5:30

दहाविच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्या. जिल्ह्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सर्व कनिष्ठ महाविद्यालयाने सुरू केली आहे.

Free Admission Schedule for Wani | वणीसाठी प्रवेशाचे स्वतंत्र वेळापत्रक

वणीसाठी प्रवेशाचे स्वतंत्र वेळापत्रक

Next

अकरावीचे प्रवेश : विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी रस्सीखेच
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दहाविच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्या. जिल्ह्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सर्व कनिष्ठ महाविद्यालयाने सुरू केली आहे. मात्र वणी शहरासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार मंगळवारपासून विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात राबविली जाणार आहे.
वणीत विज्ञान शाखेच्या दोनच तुकड्या अनुदानीत असल्याने दरवर्षी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात गाजत आहे. काही विद्यार्थ्यांच्या सामाजिक संघटना धरणे आंदोलन व इतर आंदोलनात्मक अस्त्राचा वापर करून शिक्षण विभागाला वेठीस धरत आहे. प्रशासनाला नाईलाजाने अनुदानीत तुकड्यामध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व अध्ययन प्रक्रियेवर ताण येतो. त्यामुळे यावर्षी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी वणीकडे अधिक लक्ष दिले आहे.
वणीसाठी प्रवेशाचे वेगळे वेळापत्रक तयार केले आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी सामाईक प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात प्रवेशाचे केंद्र उघडण्यात आले आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राध्यापक नंदकिशोर खीरटकर यांची केंद्रप्रमुख म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमणूक केली आहे. शहरातील लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय येथे अनुदानीत प्रत्येकी एक तुकडी व लॉयन्स कनिष्ठ महाविद्यालय व वणी पब्लिक स्कूल येथील कायम विना अनुदानीत तुकडीसाठी ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे, तर वाणिज्य शाखेसाठी लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयात एक तुकडी व वणी पब्लिक स्कुलमध्ये इंग्रजी माध्यमातील एक तुकडी यांचे प्रवेश अर्ज एकत्रपणे प्रवेश केंद्रावर भरावे लागणार आहे.
१ जुलैपर्यंत प्रवेश अर्जाचे वितरण व भरलेले अर्ज स्विकारणे, ५ जुलैपर्यंत असलेल्या अर्जाची छाननी, ६ जुलैला प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी आरक्षणानुसार प्रसिद्ध केली जाणार आहे. १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. ११ जुलै हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. १२ जुलैला रिक्त जागेकरिता प्रतीक्षा यादी जाहीर होईल. १४ जुलैपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. १५ जुलै हा दिवस राखीव ठेऊन १७ जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार आहे. १८ जुलैपर्यंत दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया थांबविली जाणार आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य सेतू
यावर्षी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रीकेवर अनुत्तीर्ण हा शेरा लिहीला नाही. एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटीनुसार ११ वीत प्रवेश मिळणार आहे, तर दोनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य सेतू योजनेअंतर्गत सहा महिन्याचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा रोजगार सुरू करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी लागणारे आवेदनपत्र शाळांना पुरविण्यात आले आहे. ते विद्यार्थ्यांनी भरून दाखवायचे आहे. नापास विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा १९ जुलैपासून घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ३० जुनपर्यंत विलंब शुल्कासहित आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत आहे.

 

Web Title: Free Admission Schedule for Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.