अरुणावती पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

By admin | Published: January 12, 2015 11:00 PM2015-01-12T23:00:12+5:302015-01-12T23:00:12+5:30

बंद अवस्थेत असलेली अरुणावती पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी गेली दोन महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या नगरपरिषदेला अखेर यश मिळाले आहे.

Free the Arunavati Water Supply Scheme | अरुणावती पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

अरुणावती पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

Next

दारव्हा : बंद अवस्थेत असलेली अरुणावती पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी गेली दोन महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या नगरपरिषदेला अखेर यश मिळाले आहे. उन्हाळ्यात दारव्हा शहराची तहान भागविण्याकरिता एकमेव पर्याय असलेल्या या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी एक कोटी रुपये मिळाले असून कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सदर योजनेच्या कामासाठी एक कोटी २७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पैकी एक कोटी एक लाख ६० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून तर उर्वरित २० टक्के रक्कम नगरपरिषदेला खर्च करावी लागणार आहे. निधी मिळाल्यामुळे आता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन योजनांमधील मोठी असलेली पेकर्डा योजना यावर्षी म्हसणी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने काही दिवसातच बंद पडू शकते. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ६० टक्के भागाला पाणीटंचाईला सामोरे जावू लागू शकते. हा धोका लक्षात घेता नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी आधीपासूनच अरुणावती पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. एवढ्या महत्त्वाच्या विषयात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने योजनेचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाठविण्यात आला. याची त्वरित दखल घेत त्यांनी नागपूर येथे बैठक घेतली. त्यावेळी नगराध्यक्ष चिरडे यांनी अरुणावती योजना सुरू न झाल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होवू शकते. त्यामुळे या योजनेच्या कामासाठी निधी देण्याची मागणी केली. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या. उशिरा का होईना नगरपरिषदेला या योजनेच्या कामासाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे कामाच्या प्रक्रियेला सुरुवातदेखील झाली आहे. शनिवारी यवतमाळ येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी, नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांची बैठक पार पडली. योजनेचे काम तत्काळ सुरू होण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Free the Arunavati Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.