कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलामुलींना मोफत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:36+5:302021-06-01T04:31:36+5:30
कोरोनावरील उपचार खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांना सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, तेथेही कधी ऑक्सिजनची ...
कोरोनावरील उपचार खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांना सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, तेथेही कधी ऑक्सिजनची आणीबाणी, बेडची कमतरता, औषधांची काळाबाजारी पाहावयास मिळते. नैसर्गिक आपत्तीबरोबर मानवनिर्मित आपत्तीमुळेही अनेक जीव प्राणास मुकले. अनेक मुले अनाथ झाली. वृद्ध मातापित्यांची कर्ते मुले गेली.
अशा हलाखीच्या परिस्थितीत त्या कुटुंबाकडे कोण पाहणार, अनाथ मुलामुलींच्या भाविष्याचे, शिक्षणाचे काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मात्र, समाज जागृत आहे, जिवंत आहे, हे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसून आले आहे. देशमुख यांनी दिग्रस तालुक्याबरोबरच दारव्हा, नेर तालुक्यातील कोरोनामुळे ज्यांचे आई, वडील मरण पावले असतील, अशा गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची सोय ईश्वर देशमुख इंग्लिश मीडिअम स्कूल, दिग्रस येथे करण्याची ग्वाही दिली आहे. संजय देशमुख मित्रमंडळ, ईश्वर फाऊंडेशन, परिवर्तन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
बॉक्स
अनाथ बालकांना नवसंजीवनी
ईश्वर फाऊंडेशन संस्थेच्या संयोजिका वैशाली संजय देशमुख यांनी अनाथ मुलामुलींना समाजात सन्मानाने जगता यावे, असे स्पष्ट केले. त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी केलेली मोफत शिक्षणाची सोय त्या अनाथ बालकांना नवसंजीवनी देणारी ठरणारी आहे, असे त्यांनी सांगितले.