खासगी कामगारांचा ‘एसटी’तून मुक्त प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:21 PM2018-07-17T22:21:52+5:302018-07-17T22:22:15+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सेवा देणाऱ्या खासगी कामगारांनी विनातिकीट प्रवासाचा सपाटा लावला आहे. महामंडळाच्या नियमांची या कामगारांनी ‘वाट’ लावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सेवा देणाऱ्या खासगी कामगारांनी विनातिकीट प्रवासाचा सपाटा लावला आहे. महामंडळाच्या नियमांची या कामगारांनी ‘वाट’ लावली आहे. विभागातील व्यवस्थापनाचीही या प्रकाराकडे डोळेझाक सुरू आहे.
महामंडळात खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगार कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगारात आणि विभागात या कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक कामगार बाहेरगावाहून ये-जा करतात. प्रवासाकरिता ‘एसटी’ बसचा वापर करतात. तिकीट न काढता त्यांचा प्रवास सुरू आहे. महामंडळाकडून या कामगारांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. महामंडळाच्या अधिकृत कामगारांशिवाय कुणालाही सवलती नाही. मात्र खासगी कामगारांनी नियमांची ऐशीतैशी केली आहे. ‘स्टाफ’च्या नावावर प्रामुख्याने काही सुरक्षा रक्षकांची दररोजची वारी सुरू आहे. खासगी कामगारांचा विनातिकीट प्रवास वाहकांसाठीही घातक ठरत आहे. बसच्या तपासणीत विनातिकीट प्रवासी आढळल्यास कारवाई केली जाते. काही प्रसंगी खासगी कर्मचारीच विनातिकीट सापडतो. अशाच प्रकारात काही महिन्यांपूर्वी यवतमाळ विभागात दोन वाहक कारवाईचे बळी ठरले होते. यानंतरही खासगी कामगारांच्या मुक्त प्रवासाला अटकाव केला जात नाही. सुरक्षा अधिकाºयांनाही कधी गरज वाटली नाही, असे दिसून येते. सुरक्षा रक्षकांची कामगिरी खरंच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आहे काय, असाही प्रश्न निर्माण होतो. यवतमाळ बसस्थानकात घडत असलेल्या विविध घटनांवरून याला बळ मिळते.
शिकाऊ उमेदवारही ‘स्टाफ’
‘एसटी’ महामंडळात विविध प्रवर्गात नवीन कामगारांची भरती झाली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. बहुतांश उमेदवार बाहेरगावचे आहेत. ते दररोज ये-जा करतात. यासाठी ‘लोकवाहिनी’चा वापर केला जातो. ‘स्टाफ’ असल्याचे सांगून त्यांचा प्रवास सुरू आहे. वास्तविक या उमेदवारांना विनातिकीट प्रवास करता येत नाही. मात्र सर्व काही सुरळीत सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी खटेश्वर येथून प्रवास करणाºया शिकाऊ उमेदवाराने वाहकाशी वाद घातला होता. त्याची तक्रार झाली होती. यावरून प्रशिक्षणार्थी उमेदवाराला दंड झाला होता. तिकीट काढून प्रवास करणाºया नागरिकांना जागा मिळत नाही. अशावेळी ‘स्टाफ’च्या नावाखाली विनातिकीट प्रवास करणाºयांनी जागा मोकळी करून देण्याचे सौजन्य दाखविण्याची गरज व्यक्त होत आहे.