प्रत्येक तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:14 PM2019-03-15T22:14:26+5:302019-03-15T22:14:57+5:30
यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांकरिता एका स्वतंत्र विशेष मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे.
या मतदान केंद्रावर सर्वच महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे केंद्राचे वैशिष्ट्य राहणार आहे. या प्रयोगामुळे महिलांचा मतदानातील टक्का वाढतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिवसेंदिवस सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. त्यात महिलांचे मतदानाचे प्रमाण फार कमी असते. लोकशाही मार्गाने प्रस्थापित होणाऱ्या सरकारच्या निवड प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी मते नोंदवावी, लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, याकरिता निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या मार्गाने आवाहन केले. तसेच जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून यावेळी निवडणुकीत खास महिलांसाठी वेगळा प्रयोग केला जात आहे.
महिला मतदान केंद्रामुळे महिलांना मतदान करणे सोयीचे होणार असून महिलांची मतदानातील टक्केवारी वाढेल, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मतदान केंद्र राहणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर तालुक्यातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल.
या प्रयोगामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढल्यास भविष्यात असे मतदान केंद्र वाढू शकतात. त्यामुळे या केंद्रावरील महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणे गरजेचे राहणार आहे.
केंद्राची सुरक्षितता महत्त्वाची
महिला मतदान केंद्र निवडताना महत्त्वाचे म्हणजे केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाºयांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड होईल, असे सांगितले जाते.