स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती इनामी काटा कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:07 PM2018-11-19T22:07:31+5:302018-11-19T22:07:51+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनी २५ नोव्हेंबरला इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने दहा लाख रुपयांची बक्षिसे असलेली ही दंगल येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात दुपारी १२ वाजता हलगी, तुतारी आणि डफाच्या निनादात सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनी २५ नोव्हेंबरला इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने दहा लाख रुपयांची बक्षिसे असलेली ही दंगल येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात दुपारी १२ वाजता हलगी, तुतारी आणि डफाच्या निनादात सुरू होणार आहे.
लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चीफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेत देशातील नामवंत मल्ल हजेरी लावतात. श्री हनुमान आखाड्याचे दिवंगत कुस्तीगीर पहेलवान गोकुल वस्ताद, श्रीराम पचगाडे, भैयालाल जयस्वाल, वामनराव नाकतोडे उर्फ बब्बी पहेलवान, मधुकरराव भेंडकर, गजानन भाटवडेकर, शेषराव अजमिरे, नथ्थूजी नासनूरकर, शाहू पहेलवान, वसंतराव जोशी गुरुजी, रामनाथ यादव, रमेश तिवारी, नानासाहेब औदार्य आदींच्या स्मृतिनिमित्त मोठ्या प्रमाणावर बक्षिसेही ठेवण्यात आली आहे.
पहिले बक्षीस ५१ हजार रुपये दिवंगत सुभाषदादा बाजोरिया यांच्या स्मरणार्थ प्रशांत बाजोरिया यांच्याकडून, द्वितीय बक्षीस ४१ हजार रुपये जनता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे, तृतीय बक्षीस ३१ हजार रुपये जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था व महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास महाजन यांच्यातर्फे, चौथे बक्षीस २५ हजार रुपये शैलेश गुल्हाने व दिवंगत वसंतराव पोटे यांच्या स्मरणार्थ प्रशांत पोटे यांच्याकडून, पाचवे बक्षीस २१ हजार रुपये गोदावरी नांदेड मल्टीस्टेट बँकेतर्फे दिले जाणार आहे. सहावे बक्षीस १५ हजार रुपये दिवंगत राजू इंगोले स्मरणार्थ भारती इंगोले यांच्यातर्फे, सातवे बक्षीस दहा हजार रुपये दिवंगत दिनेश गिरोलकर स्मरणार्थ आर.बी. कंस्ट्रक्शनकडून, आठवे बक्षीस सात हजार रुपये विजय डांगे व धनंजय भगत यांच्यातर्फे, नववे बक्षीस पाच हजार रुपये मसूदभाई यांच्याकडून, दहावे बक्षीस तीन हजार रुपये रामचंद्र गजबे यांच्यातर्फे, अकरावे बक्षीस दोन हजार रुपये सुरेश जयसिंगपुरे, तर बारावे बक्षीस एक हजार रुपयांची पाच बक्षिसे महंमद शकील पहेलवान यांच्यातर्फे दिली जाणार आहे.
यासोबतच कुस्त्यांची जोड लाऊन रोख १००, २००, ३००, ४०० व ५०० रुपयांची बक्षिसेही दिली जाणार आहे. कुस्तीमध्ये स्पर्धक व प्रेक्षकांना प्रवेश नि:शुल्क आहे. या कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने मल्लांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे, उपाध्यक्ष प्रभाकर गटलेवार, रामेश्वर यादव, कुलभूषण तिवारी, प्रताप पारसकर, दीपक ठाकूर, अनंता जोशी, सुरेश जयसिंगपुरे यांनी केले आहे.