स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे कार्य बहुआयामी; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 07:57 PM2021-11-25T19:57:12+5:302021-11-25T19:57:49+5:30

Yawatmal News शिक्षण, पत्रकारितेबरोबरच समाजसेवेत सदैव सक्रिय राहिलेले बाबूजी खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

Freedom Fighter Jawaharlal Darda's work is multifaceted; Statement of Governor Bhagat Singh Koshyari | स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे कार्य बहुआयामी; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे कार्य बहुआयामी; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

googlenewsNext
ठळक मुद्दे इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीचे लोकार्पण

यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा तळागाळातील शेवटच्या घटकाचा निरपेक्ष भावनेने विचार करीत असत. शिक्षण, पत्रकारितेबरोबरच समाजसेवेत सदैव सक्रिय राहिलेले बाबूजी खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. आज त्यांच्या स्मृतिदिनी देशाला आत्मनिर्भर करून जगतगुरू बनविण्याचा संकल्प करू या, असे आवाहनही त्यांनी केले.

मातोश्री दर्डा सभागृहाच्या लॉनमध्ये गुरुवारी जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि डॉ. गोवर्धनलाल पाराशर (राजस्थान) यांच्या ऑस्टिओपॅथी शिबिराचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे, जगतविख्यात ऑस्टिओपॅथीतज्ज्ञ गोवर्धनलाल पाराशर, लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, लोकमत एडिटर एन चीफ तथा राज्याचे माजी शिक्षण व उद्योग मंत्री राजेंद्र दर्डा, शाळेचे सचिव तथा माजी आमदार कीर्ती गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. बाबूजींनी नेहमी व्यापक विचार केला. पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य कसे मिळेल, यासाठी तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील प्रत्येकाला न्यायाचा, विकासाचा मार्ग कसा दाखविता येईल, यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. देशासाठी सर्वस्व वाहून घेण्यासाठी माणसाचे हृदयही तेवढेच मोठे असावे लागते. तरच तो दुसऱ्याच्या भल्याचा विचार करू शकतो. बाबूजींनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला. आज बाबूजींसह सर्वच क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करताना देशाला नव्या उंचीवर कसे घेऊन जाता येईल, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. समाजातील दरी मिटवून सर्वांना एका स्तरावर आणण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरजही राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा केवळ यवतमाळचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे असल्याचे सांगितले. बाबूजींचे औरंगाबादच्या विकासातही मोठे योगदान आहे. मोठ्या बाबूजींनी उद्योगमंत्री असताना औरंगाबादेत वाळूज एमआयडीसी, तर राजेंद्र बाबू उद्योगमंत्री झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादेत दुसरी एमआयडीसी म्हणजेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) उभारल्याची आठवण करून दिली. यावेळी जगतविख्यात ऑस्टिओपॅथीतज्ज्ञ डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांनीही मनोगत व्यक्त केले.

बाबूजींचा रचनात्मक कार्यावर विश्वास होता. मानवी मूल्याप्रती आस्था असलेल्या बाबूजींनी आरोग्य, शिक्षणाच्या क्षेत्रात योगदान दिले. समाजातील शेवटच्या घटकावर त्यांचे नेहमी लक्ष होते, असे लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी सांगितले. इंग्रजांविरोधात त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यानंतर ‘लोकमत’च्या माध्यमातून लोकप्रबोधनासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी प्रसारक मंडळ बेरारचे सचिव माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले. आभार जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य मिनी थॉमस यांनी मानले. कार्यक्रमाला खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, लोकमतचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, विजयाताई धोटे, लक्ष्मणराव तायडे, बबनराव चौधरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

इंग्रजीचे गुलाम होऊ नका, इंग्रजी शिकून राज्य करा

लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात मराठी ही केवळ भाषा नाही, तर संस्कृती असल्याचे सांगत, मराठी जिवंत राहिली तर राज्यभाषा वाढेल, त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा बंधनकारक करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. हाच धागा पकडत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, मी संगीत, संस्कृत आणि संस्कृतीमध्ये रुची बाळगणारा आहे. माँ, मातृभाषा आणि मातृभूमी यांच्या उद्धारासाठी कायम प्रयत्नशील राहिले पाहिजे. केंद्र शासनाने नव्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचा आग्रह धरल्याचे सांगत, इंग्रजी शिकून जगावर राज्य करा. मात्र, तिचे गुलाम होऊ नका, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

बाबूजींनी सामाजिक, आर्थिक समतेचा विचार मांडला - सुशीलकुमार शिंदे

बाबूजींनी समाजाला कायम प्रेरणा दिल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. आदिवासींचे प्रश्न घेऊन मी प्रथम त्यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी तात्काळ प्रश्न सोडवीत वंचित, दलित कष्टकऱ्यांप्रती असलेली आपली संवेदना दाखवून दिली होती. तेव्हापासून त्यांच्यावर निष्ठा आहे. बाबूजींनी कायम सामाजिक आणि आर्थिक समतेचा विचार मांडला. बाबूजी विचारांचे पक्के होते. त्यांची स्वत:ची वैचारिक भूमिका होती. ती घेऊनच ते पुढे जात. वर्तमानपत्राच्या माध्यमातून सातत्याने ते सर्वसामान्यांचा आवाज झाले. हीच भूमिका आज विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा पुढे घेऊन जात असल्याचेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

Web Title: Freedom Fighter Jawaharlal Darda's work is multifaceted; Statement of Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.