बियाणे विक्रीसाठी फ्रीज, सोन्यासह व्यापाऱ्यांना परदेश दौऱ्याचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 05:00 AM2022-05-25T05:00:00+5:302022-05-25T05:00:19+5:30
कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना हे दर पुढील वर्षीदेखील कायम राहतील, असा पोकळ आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याला २५ लाख कपाशी बियाण्यांचे पॅकेट लागणार आहे. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांसह नवख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत. या कंपन्यांच्या मुख्य विक्रेत्यांकडून कृषी सेवा केंद्र चालकांना छुप्या पद्धतीने पॅकेज दिले जात आहे. यामध्ये विदेश दौऱ्यासह देशातील धार्मिक स्थळांवर भेट घडवून आणण्याचे हे आमिष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील कृषी क्षेत्रामध्ये खरीप हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ही उलाढाल कॅश करण्यासाठी बियाणे कंपन्यांनी विक्रेत्यांना काश्मीरसह विदेश दौऱ्याचे पॅकेज जाहीर केले आहे. यासोबतच गत दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना या पॅकेजमधून मोठे आमिष दाखविल्याने बाजारपेठेत शेतकऱ्यांना सतर्क राहून बियाण्यांची खरेदी करावी लागणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरिपाचा हंगाम कॅश करण्यासाठी १०० कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. त्यांनी गावपातळीवर पोस्टर युद्ध सुरू केले आहे. हे युद्ध इतके भयंकर आहे की, गावाचे बोर्ड आणि किलोमीटरचे दगड त्यांनी व्यापून टाकले आहे. एखाद्या निवडणुकीला शोभेल, असा प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे.
यावर्षी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना हे दर पुढील वर्षीदेखील कायम राहतील, असा पोकळ आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याला २५ लाख कपाशी बियाण्यांचे पॅकेट लागणार आहे. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांसह नवख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत. या कंपन्यांच्या मुख्य विक्रेत्यांकडून कृषी सेवा केंद्र चालकांना छुप्या पद्धतीने पॅकेज दिले जात आहे. यामध्ये विदेश दौऱ्यासह देशातील धार्मिक स्थळांवर भेट घडवून आणण्याचे हे आमिष आहे. याशिवाय पर्यटनासाठी काश्मीर या ठिकाणांचा समावेश आहे. यासोबतच काही ठराविक पॅकेट्स विकल्यानंतर टीव्ही, फ्रीज, सोनेदेखील कंपन्यांनी जाहीर केलेले आहे. प्रत्येक कंपन्यांचे विक्रेते आमचा कोटा पूर्ण केला तर ठराविक रक्कम गाठल्यानंतर हे पॅकेज देणार आहे. यामुळे विक्रेते ज्या ठिकाणावरून सर्वाधिक नफा होईल, अशाच कंपन्यांना शेतकऱ्यांच्या माथी मारण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची नितांत गरज आहे.
महाडीबीटी पोर्टलवर १४,७०० अर्ज
- येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बुधवारी २५ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
- त्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि कुठले बियाणे पाहिजे, याची माहिती ऑनलाईन भरायची आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १४ हजार ७०० अर्ज आले आहेत.