आर्णीत वीजपुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:38 AM2021-07-26T04:38:17+5:302021-07-26T04:38:17+5:30
ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग ...
ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग वेगळे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मागील पाच वर्षांपूर्वी दिग्रसवरून वीजपुरवठा केला जात होता. त्यावेळीसुद्धा शहरात एवढ्या प्रमाणात पुरवठा वारंवार खंडित होत नव्हता. आता त्याहीपेक्षा जास्त वेळ पुरवठा खंडित होत आहे.
जवळा येथे १३२ केव्ही उपकेंद्र होऊनसुद्धा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीविरुद्ध रोष वाढत आहे. वितरण कंपनीचे नियोजन कुचकामी ठरले आहे. १३२ चे उपकेंद्र झाल्यावर आर्णीकर नागरिक सुखावले होते. पुरवठ्याबाबत तक्रारी निकाली लागतील, असे वाटत होते. मात्र, झाले उलटेच. उलट आता तक्रारी वाढल्या आहेत. यावरून वीज वितरण कंपनीचे धोरण चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे.
आर्णी शहर हे नावालाच उरले आहे. सुविधा ग्रामीण भागाच्याच मिळत आहे. शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. जवळा येथील १३२ केव्हीवरून आर्णी शहराला पुरवठा केला जातो. तेथूनच ३३ केव्ही येरमलहेटी, लोणबेहळ येथील ३३ केव्ही येथे पुरवठा गेला आहे. यादरम्यान कुठेही काही बिघाड झाला, तर संपूर्ण आर्णी शहर काळोखात सापडते. आर्णी शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणींचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे.
बॉक्स
तारा लोंबकळल्या, रोहित्र नादुरुस्त
शहरातील तारा लोंबकळल्या आहेत. ट्रान्सफाॅर्मर, एबी स्विचमध्ये अनेक त्रुटी आहेत. कर्मचाऱ्यांना पुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पुरेसे उपकरण नसल्यामुळे त्यांची घुसमट होते. मात्र, नागरिकांच्या रोषाला त्यांनाच बळी पडावे लागते. आर्णी शहर ५० हजार लोकवस्तीचे आहे. लागूनच नागपूर- तुळजापूर महामार्ग गेला आहे. त्यामुळे शहराला मोठे महत्त्व आले. शहर वाढत असताना वीज विभागाकडून पाहिजे अशा सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने संताप आहे.