क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच केला मित्राचा खून, लोखंडी रॉडने केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 06:26 PM2021-10-11T18:26:20+5:302021-10-11T18:42:17+5:30
आकाश व गोलू हे दोघेही मित्र होते. मात्र रविवारी या दोघांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला, या वादातच लोखंडी रॉडने हल्ला करून आकाशचा खून करण्यात आला.
यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्रावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला ठार मारले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आबई फाट्यावरील एका बारसमोर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
आकाश हरिदास गोवारदिपे (वय २३) असे मृताचे नाव असून, तो वणी तालुक्यातील वेळाबाई येथील रहिवासी आहे. आकाश व गोलू हे दोघेही मित्र होते. मात्र रविवारी या दोघांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला, या वादातच आकाशची हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून गोलू ऊर्फ प्रतीक चंद्रभान वडस्कर (२८) व सोमेश्वर गजानन कावळे (१९, दोघेही रा. वेळाबाई) यांना अटक केली. तर, या प्रकरणात आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची विचारपूस केली जात आहे.
रविवारी रात्री ८ वाजताच्यासुमारास ही घटना घडली. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच, शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेची खातरजमा केली. त्यानंतर संशयावरून गोलू ऊर्फ प्रतीक वडस्कर याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरील बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात गोलू व त्याचा साथीदार सोमेश्वर कावळे हेच मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आणखी दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत.
आरोपी गोलूविरुद्ध अवैध दारू विक्रीबाबतचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मृत आकाशची आई माया हरिदास गोवारदिपे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, नायक पोलीस अनिल सुरपाम, गंगाधर घोडाम, सुगत दिवेकर, प्रमोद जुनूनकर, पोलीस शिपाई गजानन सावसाकळे, अभिजित कोषटवार यांनी केली.