फेसबुकवरील मैत्री आली अंगलट, अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By रवींद्र चांदेकर | Published: August 18, 2023 07:25 PM2023-08-18T19:25:54+5:302023-08-18T19:26:10+5:30
पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३७६ पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीला ताब्यात घेतले.
पांढरकवडा (यवतमाळ) : फेसबुकवर झालेल्या मैत्रीनंतर एका अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करणाऱ्या तरुणाला पांढरकवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी ही फेसबुक तथा अन्य सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असायची. त्यातूनच तिची सलिमुद्दीन ऊर्फ बिट्टू ग्यासुद्दीन शेख (रा. दीनदयाळ वाॅर्ड, पांढरकवडा) या तरुणासोबत ओळख झाली. नंतर त्यांची मैत्री वाढत गेली.
हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनतर बिट्टू तिचा पाठलाग करू लागला व तिला भेटण्यासाठी बोलवू लागला. मुलीने काही दिवस नकार दिला. पीडितेला ११ वीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा ती महाविद्यालयात जात असताना मागाहून आरोपी बिट्टू गाडी घेऊन आला व तिला गाडीवर बसवून महाविद्यालयात घेऊन गेला. तिचा प्रवेश निश्चित करण्यासाठी लागणारे शुल्कसुद्धा बिट्टूनेच भरले. तेव्हापासून त्यांच्या दोघात जवळीकता वाढली.
त्याचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर बिट्टू तिला मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, अशी थाप मारू लागला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने पीडितेवर सतत २ वर्षे अनेक ठिकाणी नेऊन अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी पीडितेने आपण लग्न केव्हा करायचे असे विचारणा केली तेव्हा बिट्टूने लग्नास नकार दिला. फसगत झाल्याचे लक्षात येताच, पीडित मुलीने बुधवारी पांढरकवडा पोलिस ठाणे गाठून आरोपी सलिमुद्दीन ऊर्फ बिट्टू ग्यासुद्दीन शेख (३२) याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पांढरकवडा पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३७६ पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर करीत आहेत.