जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ मोर्चा
By admin | Published: November 1, 2014 01:16 AM2014-11-01T01:16:21+5:302014-11-01T01:16:21+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ गुरुवारी वणीत विविध संघटनांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
वणी : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ गुरुवारी वणीत विविध संघटनांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन राज्यपालांना पाठविण्यात आले.
या हत्याकांडात संजय जाधव, जयश्री संजय जाधव, सुनील जाधव यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली़ त्यांच्या मृतदेहाची खांडोळी करून मृतदेहाची विटंबना करण्यात आली़ या दलित हत्याकांडाची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना नाही, तर काही दिवसांपूर्वीच नितीन आगे याचीही हत्या झाली होती.
दलित अत्याचाऱ्याच्या घटनेत सतत वाढ होत आहे़ खैरलांजी, सोनई येथील हत्याकांड, बुलडाणा जिल्ह्यातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक काढल्याने मिरवणुकीवर झालेली दगडफेक, जळगाव जिल्ह्यात लग्न समारंभात भीमगीत वाजविले म्हणून दलित कुटुंबावर केलेला हल्ला, लातूर जिल्ह्यात मातंग समाज बांधवांची घरे जाळणे, नाशिक जिल्ह्यातील शेवगेडांग येथे दलित कुटुंबावर झालेला हल्ला किंवा नुकतेच बिड जिल्ह्यातील सौताडा येथे दलित सरपंच महिला व तिच्या परिवाराला करण्यात आलेली अमानुष मारहाण, अशा अनेक घटना घडल्या.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सर्व घडत आहे़ या घटना अतिशय लज्जास्पद असून दलितांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या असल्यामुळे तो थांबविण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. त्यातच जवखेड येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी अद्याप मोकळे आहे़ तरीही प्रशासन मूग गिळून आहे़ ही बाब सामाजिक दृष्ट्या योग्य नाही़ या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करावी, प्रकरण जलदगतीने चालवून आरोपींना कठोर शासन करावे, अन्यथा आंबेडकरी समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशांत गाडगे, मंगल तेलंग, किशोर मून, मनोज मोडक, संजय गजभिये, उल्हास पेटकर, सुधीर पडोळे, संदीप दुपारे, राजू चापडे आदींनी निवेदनातून दिला. मोर्चात वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील आंबेडकरी युवा वर्ग, विविध सामाजिक व धार्मिक संघटना सहभागी होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)